जागावाटपात मतदारसंघ लोजपकडे
वृत्तसंस्था, पाटणा
बिहारमधील नवादा या सध्याच्या मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे नाराज झाले आहेत. लोकसभेसाठी बिहारमध्ये भाजपची जनता दल युनायटेड आणि लोकजनशक्ती पार्टी यांच्याशी युती झाली असून जागावाटपात नवादा मतदारसंघ लोजपच्या पदरात पडला आहे. गिरीराज सिंह यांना बेगुसराय मतदारसंघातून लढण्याची विनंती पक्षाकडून करण्यात आली आहे.
'जागावाटपामुळे येणारी बंधने समजण्यासारखी आहेत. पण बिहारमधील अन्य कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला त्याचा सध्याचा मतदारसंघ नाकारण्यात आलेला नाही. माझ्या मतदारसंघाच्या बांधणीसाठी मी परिश्रम केलेले असतानाही हे घडले आहे,' अशी नाराजी गिरीराज सिंह यांनी व्यक्त केली.
भाजपप्रणित एनडीए आघाडीने रविवारी बिहारमधील भाजप, जदयू आणि लोजप आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यानुसार भाजप व जदयू प्रत्येकी १७ तर लोजप सहा जागा लढवणार आहे.