अ‍ॅपशहर

Janmashtami 2022 जन्माष्टमी: 'असे' करा बाळकृष्ण पूजन, आरती व पाळणा

Shri Krishna Palna and Aarti: श्रीकृष्णांचे केवळ नाव घेतले की, मुख्यत्वे करून आठवतात त्या बाललीला, राधा-कृष्ण प्रेम, बासरी, नीती-धोरणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भगवद्गीता. आज श्रीकृष्ण जयंती असून आपण आरती आणि पाळणा वाचूया...

Edited byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2022, 2:40 pm
Shri Krishna Aarti: श्रावण महिन्यात वद्य पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना बुधवारी मध्यरात्रौ ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव-देवकीच्या पोटी जन्म झाला. श्रीकृष्णांना श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानले जाते. श्रीकृष्णांना ६४ कला अवगत होत्या. अतिशय अद्भूत आणि दिव्य अस्त्र-शस्त्रे होती. श्रीविष्णूंचा पूर्णावतार म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. महाभारतात श्रीकृष्णांची भूमिका अत्यंत वेगळी होती. श्रीकृष्णांचे केवळ नाव घेतले की, मुख्यत्वे करून आठवतात त्या बाललीला, राधा-कृष्ण प्रेम, बासरी, नीती-धोरणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भगवद्गीता. आज श्रीकृष्ण जयंती असून आपण आरती आणि पाळणा वाचूया...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम janmashtami know about aarti shri krishna palna and significance in marathi
Janmashtami 2022 जन्माष्टमी: 'असे' करा बाळकृष्ण पूजन, आरती व पाळणा


श्रीकृष्णाचे पूजन

व्रतकर्त्या स्त्री-पुरुषांनी अष्टमीला कृष्णजन्म होईपर्यंत उपवास करावा. अष्टमीला सकाळी नित्य कर्मांनंतर पूर्वेला किंवा उत्तरेला मुख करून आसनस्थ व्हावे. हातामध्ये फुले, गंध, फळे, पाणी घेऊन 'माझ्या सर्व पापांचे क्षालन व्हावे आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्णत्वास जाव्यात म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करीत आहे', असा मातृभाषेतून अथवा संस्कृत भाषेतून करता येत असल्यास 'ममाखिल पापप्रशमनपूर्वक सर्वाभीष्टसिद्धये श्रीकृष्णजन्माष्टमी व्रतमहं करिष्ये', असा संकल्प करावा. रात्रौ पुन्हा स्नान करून शुचिर्भूत व्हावे. कृष्णजन्माची यथाशक्ती सिद्धता करावी.

Vastu Tips: बाळकृष्ण ते चक्रधर, जाणून घ्या श्रीकृष्णाच्या विविध रुपांचे वास्तुदिशेनुसार कसे लावावे फोटो

रात्रौ ठीक बारा वाजता घरातील सर्व मंडळींनी अथवा मंदिरामध्ये सर्व भक्तमंडळींनी एकत्र येऊन कृष्णजन्म साजरा करावा. देवकी, वसुदेवासह सर्वांच्या नावांचा उच्चार करावा. देवकीमातेला आदरपूर्वक अर्घ्य द्यावे. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. नंतर बाळकृष्णाला फराळाचा नैवेद्य दाखवावा. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे. देवमूर्ती जर शाडूची असेल तर तिचे विधिपूर्वक जवळच्या जलाशयात विसर्जन करावे. धातूची मूर्ती असल्यास ती पुन्हा नेहमीच्या स्थानी देव्हाऱ्यात ठेवावी. काही प्रांतात विशेषतः कोकणात दहीकाला केला जातो.

श्रीकृष्णाची आरती

जय जय कृष्णनाथा ।तिन्ही लोकींच्या ताता । आरती ओवाळीता। हरली घोर भवचिंता ।।धृ.।।
धन्य ते गोकुळ हो, जेथे करी कृष्ण लीला । धन्य ती देवकीमाता, कृष्ण नवमास वाहिला ।
धन्य तो वसुदेव, कृष्ण गुप्तपणे रक्षिला । धन्य ती यमुनाई, कृष्णपदी ठेवी माथा ।। १ ।।
धन्य ती नंदयशोदा, ज्यांनी प्रभु खेळविला । धन्य ते बाळगोपाळ, कृष्ण देई दहीकाला ।
धन्य ते गोपगोपी, भोगिति सुखसोहळा । धन्य त्या राधा-रुक्मिणी, कृष्णप्रेमसरिता ।।२।।

Krishna Janmashtami 2022 : जन्माष्टमी होणार वृषभ राशीत साजरी, 'या' ४ राशींना होईल लाभ

श्रीकृष्णाचा पाळणा

बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना । निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥
जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी । पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥१॥
बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी । जनकशृंखला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥२॥
मार्गी नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा । शेष धावला तत्क्षणा । उंचावूणी फणा ॥३॥
रत्‍नजडित पालख । झळके आमोलिक । वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥४॥
हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी । पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जति जयजयकारी ॥५॥
विश्‍वव्यापका यदुराया । निद्रा करी बा सखया । तुजवरि कुरवंडी करुनिया । सांडिन मी निज काया ॥६॥
गर्ग येऊनी सत्वर । सांगे जन्मांतर । कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ॥७॥
विश्‍वव्यापी हा बालक । दृष्ट दैत्यांतक । प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥८॥
विष पाजाया पूतना । येता घेईल प्राणा । शकटासुरासी उताणा । पाडिल लाथे जाणा ॥९॥
उखळाला बांधता मातेने । रांगता श्रीकृष्ण । यमलार्जुनांचे उद्धरण । दावानव प्राशन ॥१०॥
गोधन राखिता अवलिळा । कालिया मर्दीला । दावानल वन्ही प्राशील । दैत्यध्वंस करी ॥११॥
इंद्र कोपता धांवून । उपटील गोवर्धन । गाईगोपाळा रक्षून । करीन भोजन ॥१२॥
कालींदीतीरी जगदीश । व्रजवनितांशी रास । खेळुनि मारील कंसास । मुष्टिक चाणुरास ॥१३॥
ऐशी चरित्रे अपार । दावील भूमीवर । पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥१४॥
Janmashtami Wishes 2022: श्रीकृष्ण जयंती निमित्त मित्र, मैत्रीण आणि नातेवाईकांना 'अशा' द्या शुभेच्छा
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज