अ‍ॅपशहर

मंगल देशा, कणखर देशा; ऐका महाराष्ट्र दिनाची स्फुर्तीगीते

१ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. आताच्या घडीला करोनाचे संकट महाराष्ट्रासह देशावर घोंगावत असल्यामुळे सर्वांनी घरीच राहून महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका काही स्फुर्तीगीते...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2020, 9:03 am
१ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी मोठी चळवळ, आंदोलन करण्यात आले. आचार्य अत्र्यांसह अनेक दिग्गज मंडळींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि अखेर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आताच्या घडीला करोनाचे संकट महाराष्ट्रासह देशावर घोंगावत असल्यामुळे सर्वांनी घरीच राहून महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका काही स्फुर्तीगीते...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mh din


मराठी नववर्षः 'या' राशींना ठरणार यंदाचे वर्ष लाभदायक

पाहाः मराठी वर्षातील 'या' तिथींना सर्वाधिक महत्त्व

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ॥१॥

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥


गंगा नदीत विसर्जित केलेल्या अस्थी कुठे जातात?

ग्रामविकास व राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे तुकडोजी महाराज


महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान
कोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान

बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान

तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण
तू संतांची, मतिमंतांची, बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान

मातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण
मराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान
पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान
ब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण

वज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण !
काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान
मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान
पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान

रामाचे अस्त्र श्रीकृष्णापर्यंत पोहोचवणारे परशुराम

आद्य समाज सुधारक, कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे बसव


बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे
पौरुषासि अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरें
रत्‍नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा ॥ २ ॥

नग्‍न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्‍नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ॥ ३ ॥

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरी पटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा ॥ ४ ॥

गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्‍ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा॥ ५ ॥

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज