अ‍ॅपशहर

उत्सवप्रियता

आदिम काळापासून मानव हा उत्सवप्रिय प्राणी आहे. समूहजीवनात उत्सवाने आपुलकी व सुरक्षिततेची भावना दृढ व्हायची.

Maharashtra Times 28 Sep 2017, 12:33 am
आदिम काळापासून मानव हा उत्सवप्रिय प्राणी आहे. समूह जीवनात उत्सवाने आपुलकी व सुरक्षिततेची भावना दृढ व्हायची. उत्सव म्हटलं की मनामनात आनंदाला भरती येत असे. समूहनृत्य, समूहगीत हा उत्सवाचा आत्मा. धार्मिक उत्सव असो वा सामाजिक उत्सवात समूहनृत्य, समूहगान ही समूहमनाच्या चैतन्याची अभिव्यक्तीच जणू.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम festival
उत्सवप्रियता


उत्सव म्हणजे समूहाची संस्कृती, भाषा, अभिरुची, श्रद्धा संबंधीची आस्था, जिव्हाळ्याचं प्रतीक. आदिवासी समाजात आपला कुटुंब कबिला, आपली वस्ती, आपल्या गुरढोरांच्या, मुलाबाळांच्या योगक्षेमासाठी उत्सव साजरे करत. दैवी कृपेचं आवाहन करण्यासाठी उत्सव मनोभावे, उत्कटतेने साजरे होत. ग्रामीण उत्सव कृषिसंस्कृतीशी निगडीत आहेत. मृगाचं दमदार आगमन झालं. पेरण्या आटोपल्या. मग डोक्यात हिरवी स्वप्न पेरणीचा उत्सव घडतो. चोहीकडे काळ्या मातीतून कोवळी, पोपटी, लुसलुशीत फुटव्यांची सुंदर नक्षी चैतन्य फुलविते. मग श्रावणी सण-उत्सवानं ग्रामजीवनात नवा उत्साह फुलतो. ओसंडतो. आजही ग्रामीण भागात विवाहिता खास माहेरपणाला येतात. सण, उत्सवात लेकीच्या येण्यानं घरादाराला प्रेमाचा पाझर फुटतो. घर गजबजतं. स्त्रीमनाच्या भाव-भावना मुखामुखातून गाऊ लागतात. प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या शब्दाला, भावनेला नवा बहर येतो. लालचुटूक मेहंदीच्या नक्षीनं तळहात खुलतात. उत्सवापुरतं का होईना, ग्रामीण, कष्टाळू स्त्रीजीवनात आनंदाचं उधाण येतं. नागपंचमीला शेतजमिनीचं, शेतपिकांचं रक्षण करणाऱ्या नागाची भक्तिभावानं पूजा केली जाते. नाग आपलं रक्षण करणारा म्हणून त्याच्याशी जिव्हाळ्याचं नातं जोपासलं जातं.

लिंबाच्या मोठ्या, भरदार फांद्यांना झोके बांधून माहेरवाशिणी, घरातल्या बायका-पोरी उंच-उंच झोके घेत आपली मनं हळुवारपणे उलगडतात. मायलेकीच्या नात्यातलं हळवं, निःस्वार्थ प्रेम, मैत्रीणींसोबतचं मनस्वी प्रेम, छोट्या बहिणींसोबतचं लडिवाळ प्रेम हे झोक्याच्या उंच झेपेसोबत प्रेमाची झेपही गहिरी होत जाते. हा आहे सण-उत्सवाचा महिमा. उत्सवाचे क्षण भरभर सरतात; परंतु मनात मात्र आनंदोत्सव घर करून बसतो कायमचा. जगण्याचं सकारात्मक बळ देतो.

अलिकडं शहरात मात्र सण-उत्सवांचं बेगडी स्वरूप झालं आहे. तरीही उत्सवप्रियता कमी नाही. शहरातलं धकाधकीचं जीवन, दुरावलेली नाती, वेळेचा अभाव, संबंधांतली औपचारिकता यामुळे सण साजरे करण्याचा आनंद कमी होत आहे. उत्सवाच्या निमित्तानं एकत्र येणं, संबंधांना उजळा देणं, आपलेपणाची भावना जपणं हे उत्सवांमुळे शक्य होते. परंतु आज शहरी जीवनात भौतिक सुखांची उपलब्धता म्हणजे आनंद. ओढूनताणून, मारून-मुटकून आनंद मिळवायचा. उत्सवात आनंद शोधण्याचा जीवघेणा प्रकार रुळतो आहे. उत्सव साजरे करण्याची अर्थहीन स्पर्धा आनंद कसा निर्माण करेल?

उत्सव म्हणजे सत्ता, संपत्ती, अहंभावनेचं बीभत्स प्रदर्शन असं समीकरण झालं आहे. खरंतर आनंद ही नैसर्गिक भावना आहे. आनंदाची अनुभूती अंर्तमनात घडत असते. सण-उत्सवाच्या निमित्तानं आपलेपणाची भावना दृढ होते. शहरातील लोकांना मात्र आनंद मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागते. आनंदाचं केंद्र हे आपलं अंतःकरण. भोवती भौतिक सुखाचे डोंगर असतील; परंतु ती सुखं अंतःकरणाला भिडत नसतील तर निखळ आनंदाची अनुभूती कशी होईल? भ्रष्टाचार, चंगळवादानं बरबटलेल्या शहरात उत्सवांचे रूप विकृत होते आहे.

समाजमन जोडण्याचा उद्देश लुप्त झाला आहे. मनं जोडण्यासाठी गोड बोलण्याची गरज वाटेनाशी झाली आहे. सर्वार्थानं उत्सवाचे विधिनिषेध व मांगल्य न जपणाऱ्या आजच्या भ्रष्ट समाजात सण-उत्सव म्हणजे निव्वळ अवडंबर, प्रदर्शनं झाली आहेत. ज्या उत्सवात ना प्रेम, ना अगत्य, ना दानत त्या उत्सवात आनंदाऐवजी गर्व, दुरभिमान, अहंभाव हीच परिणती होते!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज