अ‍ॅपशहर

मन करा रे प्रसन्न!

निराशेच्या जोराने आशा बाहेर येऊ शकत नाही. याप्रमाणेच प्रसन्नता ही मनातच असते.

Maharashtra Times 22 Jun 2016, 4:00 am
मानवी आरोग्याचा अभ्यास करीत असताना ज्या अनेक गोष्टी समोर येतात, त्या पाहाताना, समजून घेताना थक्क व्हायला होते. ईश्वरीय शक्तीची अजब निर्मिती पाहून याला काय म्हणावे, असाही प्रश्न पडतो. लहानपणी आम्ही शिकलो ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’ त्या वचनाचा प्रत्यय दरवेळी नव्याने येतो. माझ्याकडे येणारे अनेकविध मंडळी ही नैराश्याने वेढलेली असतात. त्या पाठीमागे त्यांच्या शारीरिक आजाराचे कारण असते. ते घालविण्यासाठी मला उपाय सुचवावे लागतात. पण जेव्हा वेदांनी, उपनिषदांनी आणि संतांनी सांगितलेले रहस्य त्या त्या रचनांमधून आपण समजून घेऊ तेव्हा लक्षात येईल की, कोणत्याही कारणामुळे येणारे नैराश्य हे तात्कालिक असते. ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संतरचनेत नैराश्य घालविण्याची मात्रा सापडते. त्यामुळे बाह्य घटनांकडे फार लक्ष न देता आपल्या आंतरिक सुखाकडे जास्त दिले पाहिजे. गोळ्या-औषधांसारखे बाह्योपचार शरीर बरे करते; पण मनाचे बरे होणे हे शरीराच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असते. त्यामुळे ईश्वरीतत्त्वाला चैतन्यशक्ती मानणारा माझ्यासारखा एखादा उपासक येणाऱ्या रुग्णांना कायम मनप्रसन्नतेचा उपाय सांगतो. त्याहीपुढे जाऊन असे म्हणता येईल की, आशा आणि निराशा या मनातच वस्ती करून असतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम spiritual
मन करा रे प्रसन्न!


निराशेच्या जोराने आशा बाहेर येऊ शकत नाही. याप्रमाणेच प्रसन्नता ही मनातच असते. तिला आपण बाहेर खेचून आणले पाहिजे.

अगणित लोक देवळात, यात्रेत देव शोधतात. तो आपल्या मनातच असतो. किंबहुना मनाच्या मंदिरातच त्याची स्थापना करायची असते, हे आपण विसरतो. त्यामुळे अवडंबर माजते. मग परमेश्वर रागावतो अशा भंपक संकल्पनांना ऊत येतो. किंबहुना, तो रागवत नाही तर तो आपल्याला आपली पावले योग्य दिशेने टाकण्यासाठी दिग्दर्शन करतो.

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी

हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी।

या गीताचे बोल अनेकदा कानावर पडतात. पण ते फक्त गीत म्हणून ऐकतो आणि सोडून देतो. त्यातून सांगितलेले तत्त्वज्ञान हे फक्त हृदयगामी नसून आकाशगामी आहे. त्यासाठी आधी हृदयातील भगवंताला आनंदी ठेवण्याचा मार्ग पत्करला पाहिजे. तो तसा आपल्या हातून चोखाळला गेला की मग रामेश्वर आणि काशी यांसारखे स्थळविशेष आपल्या हृदयालाच प्राप्त होतात. आतला आत्मा-परमात्मा जोपर्यंत उपाशी राहातो तोपर्यंत आपली भौतिकातील भूक भागत नाही. अशा प्रकारची भूक न भागणे म्हणजेच जीवनातील अनारोग्य. त्या अनारोग्याला पायउतार करण्यासाठी मनाचे आरोग्य जपणे, त्यात निर्गुण तत्त्वाची शोधमोहीम राबविणे म्हणजे देव शोधण्याचा ध्यास लागणे.

असा देव एकदा सापडला की, मग मनाची प्रसन्नता उमलून येते. कळीचे फूल होण्याची जी प्रक्रिया असते तशी सहजता यात असते. मग चांगले अथवा वाईट, भले अथवा बुरे, सुख अथवा दु:ख या जोड्या राहाणार नाहीत. चांगले शोधणे, भले करणे आणि सुख मानणे ही जेव्हा मनाची अवस्था होते त्या अवस्थेला आपण निर्गुणाचा शोध म्हणूया का? तसा तो शोध घेत राहाणे याचाच अर्थ सगुणात आनंद निर्माण करणे होय. संत जे सांगतात ते यापेक्षा काही वेगळे नाही. फक्त आपण समजून घ्यायला कमी पडतो. कोणतीही गोष्ट ही समजून घेण्यासाठी नाही तर त्यापासून आपण पळून जाण्यासाठी आहे, अशी एकदा मनाची धारणा झाली की, मग कुठल्याही सत्याचा शोध अवघड होतो. ते सापडता सापडत नाही. काय होईल, कसे होईल या प्रश्नांच्या जंजाळात अडकून पडणे म्हणजे अनारोग्य आणि जे होईल ते चांगलेच होईल, अशा आशावादाने मार्गक्रमण करणे म्हणजे अनारोग्याचा अनावश्यक भाग आत्मविश्वासाने उडवून आरोग्य निर्माण करीत जाणे होय.

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज