अ‍ॅपशहर

स्वतःला बघणारा मी

आश्रमातील सगळ्या मुलांना गुरुजींनी सकाळी अंगणात बोलावलं. गुरुजींच्या समोर ताजे, रसाळ आंबे भरलेली टोपली होती. सगळ्या शिष्यांना उद्देशून गुरुजी म्हणाले, " आज सगळ्यांनी जंगलात जाऊन सरपण गोळा करून आणायचं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jan 2020, 4:00 am
आश्रमातील सगळ्या मुलांना गुरुजींनी सकाळी अंगणात बोलावलं. गुरुजींच्या समोर ताजे, रसाळ आंबे भरलेली टोपली होती. सगळ्या शिष्यांना उद्देशून गुरुजी म्हणाले, " आज सगळ्यांनी जंगलात जाऊन सरपण गोळा करून आणायचं आहे. जाताना प्रत्येकाने टोपलीतील एकेक आंबा बरोबर घेऊन जा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जिथे तुम्हाला कोणीही बघणार नाही अशाच ठिकाणी हा आंबा खायचा आहे. पुन्हा सांगतो, कोणीही तुम्हाला आंबा खाताना बघायला नको.." मुले जंगलात पळाली. संध्याकाळी गुरुजींनी विचारले, "सगळ्यांनी खाल्ला आंबा?" सगळ्यांनी होकार दिला. एक शिष्य मात्र आपला आंबा हातात घेऊन मान खाली घालून बसला होता. गुरुजींनी आश्चर्याने विचारले, " तू नाही खाल्लास आंबा? का?" रडवेल्या स्वरात तो म्हणाला, " गुरुजी, तुम्ही सांगितले होते, जिथे कोणी बघणार नाही अशा ठिकाणी आंबा खायचा. मी खूप ठिकाणी लपलो. गुहेत, झाडाच्या ढोलीत, उंच फांद्यांवर... पण..." "पण काय?" गुरुजींनी उत्सुकतेने विचारले. "गुहेत काय किंवा ढोलीत काय, माझ्या आसपास कोणी नव्हते. पण मी स्वतःला बघत होतोच की...मग कसा खाणार मी आंबा?" गुरुजी प्रसन्न हसले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Speaking-Tree


ध्यानाबद्दलच्या एका कार्यशाळेत ऐकलेली ही गोष्ट मी पुन्हा-पुन्हा स्वतःला ऐकवत असते. कोणत्याही प्रसंगात गैर वागण्याची इच्छा होऊ नये यासाठी. असा स्वतःच स्वतःकडे बघण्याचा आणि त्या दृष्टीचा धाक वाटण्याचा धडा आजवर कोणी कधी शिकवलाच नव्हता. धाक नावाच्या जंगलात अजाणत्या वयातच कधीतरी मोठ्या माणसांचे बोट धरून जावे लागले. तिथे सहसा सर्वांत पहिली भेट झाली (!) ती पोलीसकाका किंवा जाता-येता दिसणाऱ्या घराच्या कोपऱ्यावरच्या एखाद्या भीतिदायक वृद्ध भिकाऱ्याची. त्यानंतर धाक दाखवला जाऊ लागला तो घरातील वडीलधारे पुरुष किंवा शाळेमधील एखाद्या मारकुट्या बाईंचा. माणसासारखी दिसणारी-वागणारी जमात धाक दाखवण्यासाठी निरुपयोगी आहे असे वडिलधाऱ्या लोकांना जाणवताच आयुष्यात अंमल सुरु झाला तो देव नावाच्या अदृश्य शक्तीच्या धाकाचा. 'खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या, मोठ्या माणसाना उलटून बोलणाऱ्या मुलांकडे "देवबाप्पा (नेहेमीच) बघत असतो!" ( म्हणजे नेमके काय करतो? हा प्रश्न कितीदा विचारावासा वाटला पण वाटले, देवाला आवडला नाही तर?)

वय वाढल्यावर या धाकाची भाषा फक्त बदलत गेली पण त्या प्रांतातील देवाचे स्थान मात्र अढळ! मग कातडी निबर होत जाता-जाता एक गोष्ट लक्षात येऊ लागली. घराच्या देव्हाऱ्यात किंवा मंदिरात बसलेल्या ज्या देव नावाच्या 'शक्ती'चा (?) धाक आपल्याला दाखवला जातो त्या मूर्तीला आंघोळसुद्धा भक्ताला घालावी लागते! असा देव आपल्याला काय शिक्षा देणार? तो क्षण, धाकाच्या जंगलातून 'बाहेर येण्याची' वाट सापडल्याच्या आनंदाचा.

आता, कसेहि वागले, लबाडी केली, कामात चालढकल केली, टेबलाखालून पैसे घेतले, परीक्षेच्या पेपरात अफरातफर केली.. थोडक्यात जगण्याच्या व्यवहारात कधी गरज म्हणून कधी सोय म्हणून भेसळ केली तरी ते बघायला कोणी नव्हते. ही तर हवे तसे वागण्याची मोकळीकच! गोष्टीत भेटलेल्या या आंबा न खाणाऱ्या या मुलाने गालावर एक जोरात चपराक मारली आणि स्वतःच्या आत असलेल्या माझी मला गाठ घालून दिली. सांगितले, हा बघतोय तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाकडे. त्याच्या डोळ्यात थेट बघून त्याने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत जेव्हा गमावशील तेव्हा शिक्षा सुरू होईल. जी तूच तुला देशील. शिक्षा, स्वतःच्या नजरेतून उतरण्याची. ताठ मानेने जगात उभे राहता न येण्याची. शिक्षा देणारा माझ्यात वसलेला हा देव भोवतालच्या प्रत्येक माणसात आहेच की. प्रत्येकाला तो दिसावा यासाठी काय करता येईल?

- वंदना अत्रे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज