अ‍ॅपशहर

जग हे इव्हेंट

‘जग हे बंदिशाळा’ असं आधुनिक वाल्मीकी तथा ग. दि. माडगूळकर यांनी म्हटलं आहे. मात्र, आज जगास ‘जग हे इव्हेंट’ असं म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण आयुष्याला निखळ आयुष्य कुठे राहू दिलं जातंय? तर त्याचा इव्हेंट करून टाकलाय.

महाराष्ट्र टाइम्स 10 Oct 2018, 10:24 am
जग हे इव्हेंट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sagun-nirgun

सेलिब्रेशन पुरतं
भावनेस ऊत
नुस्ता फेस..

‘जग हे बंदिशाळा’ असं आधुनिक वाल्मीकी तथा ग. दि. माडगूळकर यांनी म्हटलं आहे. मात्र, आज जगास ‘जग हे इव्हेंट’ असं म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण आयुष्याला निखळ आयुष्य कुठे राहू दिलं जातंय? तर त्याचा इव्हेंट करून टाकलाय. निखळ आनंद निखळ दु:ख, निखळ सुख दुरापास्त झालंय. आनंदाला आनंद, सुखाला सुख, दु:खाला दु:ख असं काहीच राहू दिलेलं नाही. त्याचाही इव्हेंटच, नव्हे नव्हे तर जगाचं दैनंदिन कॅलेंडर इव्हेंटच्या तारखांनीच भरून गेलंय. इंव्हेट निर्माण करुन सेलिब्रेशनसाठी अक्षरश: निमित्त शोधलं जातं. या जगास या इव्हेंटचं एवढं व्यसन जडलंय की एखाद-दिवशी इव्हेंट नसेल तर जग तापाने फणफणत आजारी पडू शकते.

एक काळ असा होता की तेव्हा जगाकडे अप्रूप नावाची लाखमोलाची गोष्ट होती. एखाद्याच्या घरी टीव्ही, कुकर, असं काही आलं की पार्टी दिली जायची. त्यांनाही ती वस्तू खरेदी केल्याचा एक विलक्षण आनंद आणि अप्रूप असायचं. आता एखाद्याने २५ हजार रुपयांचा एलसीडी टीव्ही घेतला असेल तर शेजारचा पन्नास हजार रुपयांचा टीव्ही आणतो. झालं की नाही आधीच्याचं अप्रूप खतम! अन पंचवीस हजार रुपयांची किंमत शून्य. थोडक्यात लाखो रुपये माणसाकडे आहेत मात्र अप्रूप हरवलं आहे. अप्रूप हरवणं म्हणजे समाधान हरवणं अन् समाधान हरवणं म्हणजे समाज खूप काही गमावून अशांततेचा रोग स्वत:त भिनवून घेतो आहे. पहिले खिशात मोजके पैसे असायचे आता खिसे तुडुंब भरलेले आहेत. मात्र समाधान नाही.

समाधान मिळविण्यासाठी माणूस वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधायला लागला. इव्हेंट त्यातलाच एक भाग. पहिले इव्हेंट नव्हते असे नाही; मात्र असे कशाचेही नव्हते एवढं खरं! आज आईबापाचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यांच्या लग्नाची पन्नासीही साजरी केली जाते. मात्र, त्यांच्या दुखण्या-खुपण्यावरचे इलाज वेळीच केले जात नाही. आपल्या जवळच्या माणसाच्या काळजातल्या दु:खाचा सुगावा आपल्याला लागत नाही. तो मेला की अंत्यसंस्काराचा कार्यक्रम काहीही करून आपण चुकवत नाही. तो गेल्याच्या नंतर कितीही सोपस्कार तुम्ही पार पाडले, त्याचे उपयोग काय? एका बाजूला माणूस भाकरीशिवाय मरतोय अन एका बाजूला शाही विवाहाचा इव्हेंट सुरू आहे. माणसाकडे सत्ता, संपत्ती आहे आणि ती मिरविण्याची एकमेव जागा, म्हणजे इंव्हेट! असा हा मुलभूत शोध माणसाला जर लागला नसता तर माणसाचे काय झाले असते? याचा विचारही नको करायाला. आजकाल फेसबुक आणि व्हॉटसअॅपचं आयतं कोलीत हाती लागल्याने इव्हेंटला विशेष उत्तेजना मिळाली. इव्हेंटचं पीक वारेमाप फोफावलं.

‘गेट-टुगेदर’च्या इव्हेंटला अलीकडे तर सुगीचे वातावरण आहे. ते जोरकसपणे साजरं केलं जातंय; जिकडेतिकडे चोहीकडे! अमुक एकासालची दहावी किंवा कुठल्याही इयत्तेची बॅच एकत्र येणार. जेवण-खाणं, गाणी गोष्टी, आठवणी..पुन्हा मी काय कमावलं याचा पाढा. चार ठिकाणी फ्लॅट, प्लॉट घेतले. पाचपन्नास एकर जमीन खरेदी केली, स्वत:ची कंपनी उभी केली. त्याच बॅचमधील आपला एखादा सहकारी कर्जबाजारी होऊन प्रचंड आर्थिक गोत्यात सापडला असेल, त्यास काढलं जातं का हात देऊन बाहेर? एखाद्याची तर आत्महत्याही झाली असेल, त्याच्या कुटंबापर्यंत गेलेयत का आपल्या खिशातले दहा रुपये? त्याच्या नशिबावर हवाला ठेऊन हळहळीची स्तोत्रे गाईली जातात. इति कोरड्या संवेदनशीलतेच्या पावसाची सर बरसून गेल्यावर, पुन्हा सेल्फीबिल्फीचे सोपस्कार. व्हॉटसअॅप फेसबुकवर फोटो पोस्ट करुन झाले की गेट-टुगेदर सक्सेसफूल!

माणुसकी, आपुलकीचे चार ओळीचे एसएमएस चिकार फॉरवर्ड केले जातात. त्याचं कवडीही आचरण नाही. सेलिब्रेशनची सवय जरका इतकीच अंगवळणी पडली असेल तर माणुसकीचा इव्हेंट साजरा झाला पाहिजे. आपुलकीचा इव्हेंट साजरा झाला पाहिजे. त्यासंदर्भातील पोस्ट फेसबुकवर पोस्ट होण्यापेक्षा लोकांच्या काळजातल्या भिंतीवर पोस्ट झाली पाहिजे...मग सुखा-समाधानाचे असंख्य लाईक-कमेंट आपोआप पडतील!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज