अ‍ॅपशहर

पहिला ई-कॉमर्स उपग्रह ‘अलीबाबा’चा!

बीजिंग : ऑनलाइन मार्केटिंग क्षेत्रातील चीनची दिग्ग्ज कंपनी ‘अलीबाबा’तर्फे पुढील वर्षी जगातील पहिला ‘ई-कॉमर्स’ उपग्रह सादर करणार आहे.

Maharashtra Times 26 Sep 2016, 3:00 am
बीजिंग : ऑनलाइन मार्केटिंग क्षेत्रातील चीनची दिग्ग्ज कंपनी ‘अलीबाबा’तर्फे पुढील वर्षी जगातील पहिला ‘ई-कॉमर्स’ उपग्रह सादर करणार आहे. हा उपग्रह सादर झाल्यानंतर त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून शेतीच्या संबंधातील आकडेवारी आणि हवामानाच्या नोंदी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘चायना अॅकेडमी ऑफ लाँच व्हेइकल टेक्नॉलॉजी’ आणि ‘चायना स्पेस म्युझियम’ यांच्या मदतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून जगभरात ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वप्रकारच्या सेवा देणे सहज शक्य होईल, असेही कंपनीने म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alibaba to launch sattelite in a first
पहिला ई-कॉमर्स उपग्रह ‘अलीबाबा’चा!


गुंतवणुकीला चालना

नवी दिल्लीः सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती वाढून बाजारात वस्तूंचा वापर वाढणार ही शक्यता फोल ठरण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावरील ब्रोकरेज संस्था यूबीएसच्या मते, बाजारात मागणी वाढण्याऐवजी बचतीचे व गुंतवणुकीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगामुळे शहरात मागणीचे प्रमाण वाढणार नसल्याचा दावा यूबीएसने केला आहे. शहरी सरकारी कर्मचाऱ्यांना थकित वेतन मिळाल्यावर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर बचत होईल. आपले भविष्य अधिकाधिक सुरक्षित करण्याकडे लोकांचा कल वाढेल, असेही या संस्थेने म्हटले आहे.

‘बीएसएनएल’चे फोरजी

मुंबईः ‘बीएसएनएल’ने ८३ पैशांत एक जीबी फोर जी डेटा देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, कंपनीने २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा देण्याची योजना नुकतीच जाहीर केली होती. त्यामुळे एक जीबी डेटा एक रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. ३०० जीबी फोर जी डेटा संपल्यानंतर ग्राहक एक एमबीपीएस वेगाने अमर्यादित मोफत डेटा वापरू शकणार आहे. योजनेंतर्गत कंपनी अधिकाधिक दोन एमबीपीएस दराने डेटा वितरित करणार आहे. तर, ‘जिओ’तर्फे १३५ एमबीपीएस वेगाने डेटा वितरित करण्यात येणार आहे.

बाजार भांडवल वाढले

नवी दिल्लीः टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, ओएनजीसी व कोल इंडिया या सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात ३३ हजार ९८५.४६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फायदा झाला आहे. आयटीसी, इन्फोसिस व हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट दिसून आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलात ८ हजार ८५३.६८ कोटी रुपयांनी वाढ होत ते ३ लाख ५७ हजार ६९८.२४ कोटी रुपयांवर गेले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या बाजार भांडवलात मात्र कोणताही बदल झाला नसून ते १ लाख ९७ हजार ४८५.०५ कोटी रुपयांवर स्थिर राहिले आहे.

‘एअरटेल’च्या नव्या योजना

मुंबईः आघाडीची दूरसंचार कंपनी ‘एअरटेल’नेही दोन नव्या पोस्टपेड योजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ११९९ रुपयांच्या मासिक शुल्कात कंपनी थ्रीजी, फोर जी डेटासह अमर्यादित व्हॉइस कॉलची सुविधा देत आहे. ‘मायप्लॅन इन्फिनिटी’अंतर्गत कंपनीने या योजनेची घोषणा केली आहे. या शिवाय दररोज १०० मोफत एसएमएस, विंक म्युझिक आणि विंक मूव्हीज आदी सुविधाही देण्यात येणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज