अ‍ॅपशहर

अन्य बँकांची एटीएम वापरल्यास जादा शुल्क

एटीएम ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेमध्ये दर्जावृद्धी व्हावी ही अपेक्षा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली असली तरी याचा भार खातेदारांवरच पडणार असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँक व एटीएमचालक यांच्या कात्रीत ग्राहक सापडणार आहेत.

Maharashtra Times 20 Apr 2018, 1:54 am

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम ATM


एटीएम ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेमध्ये दर्जावृद्धी व्हावी ही अपेक्षा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली असली तरी याचा भार खातेदारांवरच पडणार असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँक व एटीएमचालक यांच्या कात्रीत ग्राहक सापडणार आहेत. ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी हायर इंटरचेंज रेट वाढवावा लागेल अशी भूमिका या एटीएमचालकांनी घेतली आहे. यामुळे महिन्यातून पाचपेक्षा अधिक वेळा अन्य बँकांची एटीएम वापरल्यास ग्राहकांना लवकरच अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

तीन ते पाच रुपयांचा भुर्दंड

अन्य बँकेच्या एटीएमद्वारे व्यवहार केल्यानंतर किमान तीन रुपयांपासून पाच रुपयांपर्यंत शुल्क आकारणी करण्याची मागणी 'कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री'ने (सीएटीएमआय) केली आहे. या दरांमध्ये वाढ झाल्यास महागाईमुळे झालेली खर्चांतील वाढ एटीएम ऑपरेटर्सना भरून काढता येणार आहे. संस्थेचे संचालक के. श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेने या संदर्भात अतिशय कडक नियमावली जारी केली आहे. या नियमावलीमुळे एटीएम ऑपरेटर्सच्या खर्चांत वाढ होण्याची शक्यता आहे.

नियमावली काय?

रिझर्व्ह बँकेने जुलैमध्ये बँकांना रोख रकमेच्या व्यवस्थापनासंदर्भात एटीएम ऑपरेटर्ससाठी काही निकष जारी केले आहेत. त्यानुसार एटीएम सेवा पुरवठादारांनी ३०० कॅश व्हॅनचा ताफा, एक चालक, दोन सुरक्षा रक्षक आणि कमीतकमी दोन बंदुकधारी सुरक्षा रक्षक बाळगण्याचे बंधन घातले आहे. या शिवाय रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनात जीपीएस बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित वाहन जिओ फेसिंग मॅपिंग आधारित असावे, असेही नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. जेणेकरून आणीबाणीच्या प्रसंगी संबंधित वाहनाची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला देणे शक्य होणार आहे. या संदर्भात 'कॅटमी'ची रिझर्व्ह बँक आणि 'नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'शी चर्चा सुरू आहे. 'कॅटमी'च्या मते 'इंटरचेंज रेट'मध्ये वाढविण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सर्वसामान्य बँक ग्राहकांच्या खिशावरील बोजा आणखी वाढेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज