अ‍ॅपशहर

आरोग्यविम्याची निवड काळजीपूर्वक व्हावी

भारतीय नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात वाढ झाली त्या प्रमाणात आरोग्यसेवेवर होणारा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढला. आरोग्यसेवा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला तसेच जीवनशैली आणि गंभीर आजारांमध्येही वाढ झाली.

Maharashtra Times 10 Oct 2018, 4:00 am
भास्कर नेरूरकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम HEALTH


भारतीय नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात वाढ झाली त्या प्रमाणात आरोग्यसेवेवर होणारा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढला. आरोग्यसेवा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला तसेच जीवनशैली आणि गंभीर आजारांमध्येही वाढ झाली. नागरिकांचे उत्पन्न आणि क्रयशक्ती वाढल्याने नागरिकांचा सर्वोत्तम आरोग्यसुविधेची निवड करण्याकडे कल वाढला आहे. यातूनच अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यसमस्यांमुळे येणाऱ्या संकटाचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्यविमा घेण्याची गरजही भासू लागली. भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यविमा सुविधा पुरवतात. अलीकडच्या काळात मात्र, स्वतःहून कमी वयातच स्वतंत्र आरोग्यविमा घेण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. बाजारात सध्या वैयक्तिक आरोग्यविम्याचे बहुविध पर्याय उपलब्ध आहेत. आरोग्यविमा घेतल्याने तुम्हाला तुमच्या विमासंरक्षणाइतक्या किंमतीची वैद्यकीय सेवा कॅशलेस स्वरूपात उपलब्ध होऊ शकते किंवा तुम्ही आरोग्यसेवेसाठी केलेल्या खर्चाची परतफेड मिळते. उपलब्ध विमा योजनांपैकी योग्य योजनेची निवड करणे महत्त्वाचे ठरते. यामध्ये आपले आरोग्य आणि कुटुंबाची गरज हे घटक निर्णायक ठरतात.

वैयक्तिक आरोग्यविमा

वैयक्तिक आरोग्यविमा योजना हा आरोग्यविम्याचा सर्वांत सोपा पर्याय आहे. यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र विमा संरक्षण निवडता येते. वैयक्तिक आरोग्यविमा योजनेमध्ये रुग्णालयात दाखल झाल्यामुळे होणारा खर्च, डॉक्टरांची फी, अॅम्ब्युलन्सचा खर्च, आरोग्यसेवेचे शुल्क, आणि रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि घरी सोडल्यानंतर झालेल्या वैद्यकीय खर्चाचा समावेश असतो. ग्राहकाला जितक्या रकमेचे संरक्षण हवे, त्यानुसार हप्त्याचा दर निश्चित केला जातो. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र आरोग्यविमा उतरवू शकता.

कुटुंब विमा योजना

संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यसेवेसाठी येणारा खर्च सुरक्षित व्हावा यासाठी कुटुंब विमा योजना (फॅमिली फ्लोटर) उपलब्ध आहे. कुटुंब आरोग्यविमा योजनेद्वारे तुम्हाला एकाच योजनेतून संपूर्ण कुटुंबासाठी संरक्षण मिळते. तसेच, सर्वांसाठी स्वतंत्र विमा उतरवावा लागत नाही आणि त्याची कागदपत्रेही सांभाळावी लागत नाहीत. तुमच्यासह आई-वडील, पत्नी व मुले यांच्यासाठी एकच आरोग्यविमा उतरवण्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे.

ज्येष्ठ नागरिक विमा योजना

६० किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा चांगला पर्याय आहे. वाढत्या वयानुसार आरोग्यसमस्या वाढत जातात. त्यामुळे त्यांच्या गरजा लक्षात घेऊन या वयोगटातील नागरिकांसाठी खास योजना सादर केल्या गेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा उतरवल्यास त्यापोटी प्राप्तिकरातून वजावटही मिळू शकते. स्वत:साठी, पत्नी, मुले आणि पालकांसाठी काढलेल्या आरोग्यविम्यासाठीही प्राप्तिकरातून दरवर्षी २५ हजार रुपयांपर्यंतची वजावट घेता येते. ही वजावट ६० वर्षांपर्यंतच्या करदात्यांना मिळते. एखाद्याने ज्येष्ठ नागरिक असलेल्या त्यांच्या आई-वडिलांसाठी आरोग्य विमा योजना घेतली तर त्यासाठी प्राप्तिकरातून ५० हजार रुपयांपर्यंत वजावट मिळते.

गरजांची पडताळणी

आपल्या आरोग्य गरजांसाठी सर्वंकष व पुरेसे विमाकवच मिळण्यासाठी गरजांची पडताळणी करून त्यानुसारच योग्य त्या आरोग्यविमा पर्यायाची निवड करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी फक्त किंमत आणि हप्ता न पाहता, विम्यामध्ये समाविष्ट नसलेल्या बाबी, ग्राहकांना भरावी लागणारी रक्कम (को-पे), विविध आजारांवर किंवा सेवांवर मिळणाऱ्या रकमेची मर्यादा, काही आजारांवरील उपचारांचा खर्च मिळण्यासाठी आवश्यक किमान कालमर्यादा, योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांची यादी आदी बाबीदेखील बारकाईने तपासून पाहणे आवश्यक आहे.

(लेखक बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्समध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत.)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज