अ‍ॅपशहर

शेतकऱ्यांची सोयाबिनकडे पाठ

दर पडल्यामुळे यंदा भारतीय शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या लागवडीकडे पाठ फिरवल्याने लागवडीखालील क्षेत्र १० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे पामतेल आणि सोयतेलासाठी आयातीवर अवलंबून राहण्याची वेळ येणार आहे.

Maharashtra Times 25 May 2016, 3:00 am
दर घटल्याने पैशासाठी डाळींना प्राधान्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers shy away from sowing soyabin
शेतकऱ्यांची सोयाबिनकडे पाठ


वृत्तसंस्था, मुंबई

दर पडल्यामुळे यंदा भारतीय शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या लागवडीकडे पाठ फिरवल्याने लागवडीखालील क्षेत्र १० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे पामतेल आणि सोयतेलासाठी आयातीवर अवलंबून राहण्याची वेळ येणार आहे. सोयाबीनऐवजी शेतकऱ्यांनी आता कडधान्यांना आणि डाळींना पसंती दिली आहे.

खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असणाऱ्या आपल्या देशात उन्हाळ्यात सोयाबीनची लागवड केली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांत सोयाबीनच्या दरांमध्येही १० टक्क्यांची घट झाली आहे. याच कालावधीत तूरडाळीच्या दरात तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या ऐवजी कडधान्ये आणि डाळींकडे मोर्चा वळवला आहे. सोयाबीनचे उत्पादन घटल्यास देशाला खाद्यतेलांसाठी तसेच देशांतर्गत बाजारात महागाई भडकू नये, यासाठी सरकारला आयातीवर अवलंबून राहण्याची वेळ येणार आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात परकी चलन मिळवून देणाऱ्या सोयामीलच्या निर्यातीवरही संकट कोसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

‘गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये डाळींच्या तुलनेत सोयाबीनने शेतकऱ्यांना फारच कमी परतावा दिला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या लागवडीत घट होत आहे,’असे ‘रुची सोया’चे मुख्य संशोधन अधिकारी के. एन. रहमान यांनी दिली. ‘चालू वर्षात डाळींचे आतापर्यंतच्या सर्वोच्च किमतीला पोहोचले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आपला मोर्चा डाळींच्या उत्पादनाकडे वळवला आहे. त्यामुळे चालू वर्षात सोयाबीनच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ ते १० टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे,’ असेही रहमान म्हणाले. २०१५-१६ या आर्थिक वर्षात देशात सोयाबीनखालील लागवडीचे क्षेत्र १.१६ कोटी हेक्टर होते. यंदा (२०१६-१७) सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्र घसरून सुमारे १.०५ कोटी हेक्टरवर येण्याची शक्यता आहे. इंडोनेशिया, मलेशियामधून प्रामुख्याने पामतेलाची तर, अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयातेलाची आयात करण्यात येते.

जूननंतर होते लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात सोयाबीन आणि डाळींची लागवड करण्यात येते. साधारणतः जून महिन्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पेरण्यांना सुरुवात होते. मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, राजस्थानच्या उत्तरेला, तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सोयाबीन आणि डाळींची लागवड करण्यात येते.
आर्थिक वर्ष सोयाबीनची लागवड (कोटी हेक्टर)
२०१५-१६ १.१६
२०१६-१७ १.०५

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज