अ‍ॅपशहर

मुकेश अंबानीच सर्वात श्रीमंत; अदाणींची मोठी झेप

अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाच देशातील श्रीमंत उद्योजकांनाही त्याची काही प्रमाणात झळ बसली असून अव्वल १०० श्रीमंतांच्या संपत्तीत ८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सलग बाराव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय हे आपलं स्थान अढळ राखलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Oct 2019, 11:36 pm
नवी दिल्ली : अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाच देशातील श्रीमंत उद्योजकांनाही त्याची काही प्रमाणात झळ बसली असून अव्वल १०० श्रीमंतांच्या संपत्तीत ८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सलग बाराव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय हे आपलं स्थान अढळ राखलं आहे. मुख्य म्हणजे यंदाच्या पहिल्या १०० श्रीमंतांच्या यादीत अदाणी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी उत्तुंग झेप घेत थेट दुसरे स्थान पटकावले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ambani-adani


'फोर्ब्ज इंडियाने' भारतातील १०० सर्वाधिक श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली असून या यादीत ५१.४ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह मुकेश अंबानी पहिल्या स्थानी आहेत. दूरसंचार क्षेत्रात जिओने केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर अंबानी यांच्या संपत्तीत ४.१ अब्ज डॉलरची भर पडली आहे. एकीकडे या यादीत मुकेश अंबानी हे नाव सातत्याने पहिल्या स्थानी झळकत असताना मुकेश यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांना मात्र यंदाच्या यादीत स्थान मिळू शकलेले नाही.

जिओच्या ग्राहकांना लवकरच दिलासा

अदाणी यांची उत्तुंग झेप

इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील आघाडीचे नाव असलेल्या गौतम अदाणी यांनी या यादीत उत्तुंग झेप घेतली आहे. आठ पायऱ्या वर चढत अदाणी या यादीत थेट दुसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान आता त्यांना मिळाला आहे. अदाणी यांची एकूण संपत्ती आता १५.७ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. अदाणी यांच्या उद्योगाच्या कक्षा विस्तारत आहेत. ऑस्ट्रेलियात कोळसा खाण व्यवसायात त्यांनी पाऊल ठेवले आहे. याशिवाय एअरपोर्ट्सपासून ते डेटा सेंटर्सपर्यंतची क्षेत्रे अदाणी समूहाने व्यापली असून त्यातूनच अदाणी यांच्या संपत्तीला नवी उभारी मिळाली आहे.

श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा ब्रदर्स १५.६ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानी, पालनजी मिस्त्री हे १५ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह चौथ्या स्थानी तर आघाडीचे बँकर उदय कोटक हे १४.८ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह पाचव्या स्थानी आहेत.

पतंजलीची घसरण; बालकृष्ण यांची संपत्ती घटली

शंभरमधील निम्म्याहून अधिक श्रीमंतांची संपत्ती घटली आहे. यात १४ जणांच्या संपत्तीत १ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त घट झाली आहे. पहिल्या १०० श्रीमंतांची एकूण संपत्ती यंदा ४५१ अब्ज डॉलर इतकी असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संपत्ती ८ टक्क्यांनी कमी आहे. अजीम प्रेमजी यांनी केलेलं दान हे यामागील एक प्रमुख कारण आहे. मार्च महिन्यात प्रेमजी यांनी आपल्या संपत्तीतील एक मोठा वाटा दान केला होता. अर्थात त्यामुळे प्रेमजी या यादीत दुसऱ्या स्थानावरून थेट सतराव्या स्थानी गेले आहेत. पतंजली आयुर्वेदच्या उत्पादनांची विक्री घटल्याने आचार्य बालकृष्ण यांच्या संपत्तीत दोन तृतियांशने घट झाली आहे.

मंदीची झळ सोसना! वाहन विक्रीत घसरण सुरुच

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज