अ‍ॅपशहर

आयुर्विम्यात टर्म प्लॅनला प्राधान्य द्यावेः अनिलकुमार सिंग

अनेक तरुण व्यावसायिक तसेच लठ्ठ पगार असणारे नोकरदार वयाच्या तिशीमध्ये किंवा त्यापूर्वीच गृहखरेदी करतात. परंतु या घरासाठी घेतलेल्या कर्जाची जबाबदारी आपण पेलू शकू की नाही याबद्दल मात्र ते साशंक असतात. संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी असल्याने त्यांना ही चिंता सतावत असते. ही चिंता आयुर्विमा व प्रामुख्याने टर्म विमा पूर्ण करतो. मात्र २५ ते ३० वयोगटांतील (लग्न झालेले असो वा नसो) तरुणतरुणींना 'मला जीवन विम्याची गरज काय?' असा प्रश्न पडतो.

महाराष्ट्र टाइम्स 13 Feb 2019, 4:00 am
मुंबईः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम insurance


अनेक तरुण व्यावसायिक तसेच लठ्ठ पगार असणारे नोकरदार वयाच्या तिशीमध्ये किंवा त्यापूर्वीच गृहखरेदी करतात. परंतु या घरासाठी घेतलेल्या कर्जाची जबाबदारी आपण पेलू शकू की नाही याबद्दल मात्र ते साशंक असतात. संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी असल्याने त्यांना ही चिंता सतावत असते. ही चिंता आयुर्विमा व प्रामुख्याने टर्म विमा पूर्ण करतो. मात्र २५ ते ३० वयोगटांतील (लग्न झालेले असो वा नसो) तरुणतरुणींना 'मला जीवन विम्याची गरज काय?' असा प्रश्न पडतो. उत्तम जीवनशैली जगू पाहणारी ही पिढी जोखीम स्वीकारण्यासाठीही तयार असते. मात्र यासाठी टर्म विम्याचा आधार अत्यावश्यक ठरतो. यामुळे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुमच्या कुटुंबीयांचे राहणीमान खालावत नाही.

विमा खर्चिक नाही

आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनातून असे आढळून आले आहे की, २० ते ३० वयोगटांतील मिलेनियल्सना असे सर्रास वाटत असते की त्यांना आयुर्विम्याची गरज नाही. तसेच, आयुर्विमा हा बराच खर्चिक असतो. मात्र असे मानणे चुकीचे आहे. खास करून टर्म प्लॅन हे त्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाचे पुरेपूर मूल्य देणाऱ्या व अॅशुअर्ड रक्कमदेखील जास्त असणाऱ्या सर्वात चांगल्या योजनांपैकी आहे. सर्वसाधारण पाहणीत असेही दिसून आले आहे की वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर घेतले जाणारे आर्थिक संरक्षणाविषयीचे निर्णय योग्य ठरतात. वय जितके कमी तितकी प्रीमियमची रक्कम कमी, लहान वयात आर्थिक जबाबदाऱ्या व खर्चदेखील कमी असतात, जे भविष्यात वाढत जातात. आयुर्विमा योजनांचा प्रीमियम अनिश्चिततांवर निश्चित होतो. आज निरोगी असणाऱ्यांना आयुर्विम्याचा प्रीमियम भरणे ओझ्याचे वाटत असेल. मात्र तुम्ही अचानक आजारी पडलात तर तुम्हाला आयुर्विमा योजना घेता येणार नाही. त्याशिवाय वाढते वय, आरोग्याची स्थिती, धूम्रपान, मद्यपान अशा सवयी इत्यादींमुळे हव्या असलेल्या आयुर्विमा सुरक्षेचा खर्च भविष्यात कितीतरी पटींनी वाढलेला असेल.

कोणती पॉलिसी घावी?

टर्म पॉलिसी निवडताना खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात. तुमची सध्याची स्थिती पडताळून पहाणे, तुमचे सध्याचे वय, तुम्ही एखाद्या कर्जाची (शिक्षण, कार, घर इत्यादी) परतफेड करत आहात का, तुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या तुमच्यावर अवलंबून आहे का, भविष्यात तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरज काय असतील, तुम्हाला ज्याप्रकारची जीवनशैली हवी आहे त्यानुसार तुमचे मूलभूत खर्च किती असतील, या मुद्द्यांचा विचार केल्यास कोणती पॉलिसी घ्यावी याचे उत्तर सापडते. तुमच्या सध्याच्या परिस्थितीनुसार पॉलिसीचा कालावधी व विमा संरक्षणाची रक्कम ठरवणे योग्य ठरते. सद्यस्थितीतील जीवनशैली राखण्यासाठी वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १५पट विमा संरक्षणाची गरज असते. टर्म प्लॅन म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नाच्या ऐवजी वापरावयाचे आर्थिक संरक्षण असे मानले जात असल्याने निवृत्तीच्या वयापर्यंत किंवा जोपर्यंत कुटुंबातील इतर व्यक्ती तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहतील त्या वयापर्यंत विमा संरक्षण घेणे आवश्यक ठरते.

योग्य कंपनी निवडा

विम्याचा दावा निकाली काढण्याची वेळ येईल तेव्हा आपले सर्व वायदे पूर्ण करेल अशी विमा कंपनी निवडा. यासाठी कंपनी व ब्रँडची पत, तिची प्रतिष्ठा तपासावी. आयआरडीएआयच्या (विमा नियामक प्राधिकरण) मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित कंपनीचे दावे निकाली काढल्याचे प्रमाण किती आहे ते तपासावे. तसेच, ग्राहक सेवा अनुभव कसे आहेत तेदेखील पहावे. तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा नेहमीच पूर्ण होत राहाव्यात असे वाटत असेल तर टर्म प्लॅनसारखी निव्वळ संरक्षक योजना निवडणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरीने तुम्ही इतर बचत व गुंतवणूक योजनांचाही लाभ घेऊन आपल्या कुटुंबीयांना सर्वसमावेशक सुरक्षा देऊ शकता. तरुण वयापासूनच किंवा मध्यम वयात असो, जेव्हा तुम्ही टर्म विमा घेता तेव्हा त्यातून तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल प्रेम व जबाबदारीची पुरेपूर जाणीव आहे हे दिसून येते, हे विसरू नका.

(लेखक आदित्य बिर्ला सन लाइफ कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहेत.)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज