अ‍ॅपशहर

आयडिया-व्होडाफोन विलिनीकरण लांबले

आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया यांच्यातील बहुचर्चित विलिनीकरणाला आणखी वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दूरसंचार विभाग विलिनीकरणापूर्वी व्होडाफोनकडून ४,७०० कोटी रुपयांची 'फ्रेश डिमांड' करण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 25 Jun 2018, 6:18 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम idea-vodafone


आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया यांच्यातील बहुचर्चित विलिनीकरणाला आणखी वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दूरसंचार विभाग विलिनीकरणापूर्वी व्होडाफोनकडून ४,७०० कोटी रुपयांची 'फ्रेश डिमांड' करण्याची शक्यता आहे. व्होडाफोन आपल्या सर्व कंपन्या एका छत्राखाली आणणार असून, पैकी एका कंपनीकडून दूरसंचार विभागाला एकवेळ स्पेक्ट्रम शुल्कापोटी ४,७०० कोटी रुपये येणे बाकी आहे.

व्होडाफोनने २०१५मध्ये आपल्या चार उपकंपन्यांना (व्होडाफोन इस्ट, व्होडाफोन साउथ, व्होडाफोन सेल्युलर आणि व्होडाफोन डिजिलिंक) सामावून घेतले होते. या सर्व कंपन्यांची मिळून आताची व्होडाफोन इंडिया कंपनी अस्तित्वात आली. त्या वेळी दूरसंचार विभागाने व्होडाफोनकडून एकरकमी शुल्क म्हणून ६,६७८ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्या विरोधात व्होडाफोनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार व्होडाफोनने केवळ दोन हजार कोटी रुपयांची रक्कम भरली. या प्रस्तावित विलिनीकरणानंतर नव्या कंपनीचे नाव व्होडाफोन आयडिया लिमिटेड असे होणार असून, ती देशातील सर्वांत मोठी मोबाइलसेवा पुरवठादार कंपनी होणार आहे. सध्या भारती एअरटेल ही देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे. सद्यस्थितीत दोन्ही कंपन्यांवर मिळून १.१५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. विलिनीकरणानंतर व्होडाफोनचा हिस्सा ४५.१ टक्के, आदित्य बिर्ला समूहाचा हिस्सा २६ टक्के आणि भागधारकांचा हिस्सा २८.९ टक्के राहणार आहे. विलिनीकरणानंतर नव्या कंपनीचा बाजारहिस्सा ३६.६७ टक्के होणार आहे. सध्या व्होडाफोन इंडियाचा बाजारहिस्सा १८.८२ टक्के असून, आयडियाचा १७.८५ टक्के आहे. २५.७० टक्के हिश्श्यासह एअरटेल आघाडीवर आहे. रिलायन्स जिओचा बाजारहिस्सा १५.७६ टक्के असून, बीएसएनएल आणि अन्य कंपन्यांचा हिस्सा १२.४४ टक्के आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज