अ‍ॅपशहर

भारतही आक्रमक

अमेरिका व चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे जगभरात चिंता व्यक्त होत असतानाच भारतानेही अमेरिकेला दणका दिला आहे. अमेरिकेतून आयात होणाऱ्या २९ वस्तूंवर अतिरिक्त कर आकारण्याचा निर्णय भारताने गुरुवारी घोषित केला.

PTI 22 Jun 2018, 4:00 am

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind-us


अमेरिका व चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे जगभरात चिंता व्यक्त होत असतानाच भारतानेही अमेरिकेला दणका दिला आहे. अमेरिकेतून आयात होणाऱ्या २९ वस्तूंवर अतिरिक्त कर आकारण्याचा निर्णय भारताने गुरुवारी घोषित केला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी या विषयीची एक अधिसूचना प्रसिद्ध केली. ही अतिरिक्त करवाढ चार ऑगस्टपासून लागू होणार आहे.

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतून येणाऱ्या चणा डाळ, मसूर डाळ व हरभऱ्यावर यापुढे सर्वाधिक आयात कर बसणार आहे. या पदार्थावर तूर्तास ३० टक्के असणाऱ्या करात आणखी ४० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या आयात डाळींवर एकूण ७० टक्के आयात कर लागू होईल. मसूर डाळीवरील आयात कर ३० टक्क्यांवरून ४० टक्के करण्यात आला आहे. अमेरिकेहून आयात होणाऱ्या बदाम व आक्रोडालाही फटका बसणार आहे. अमेरिकी बदामांवर आता प्रतिकिलो १२० रुपये आयात कर आकारला जाईल. आतापर्यंत हा कर प्रतिकिलो १०० रुपये होता. अमेरिकी आक्रोडांवर तर ३० टक्क्यांऐवजी १२० टक्के आयात कर लागू होणार आहे. अमेरिकी सफरचंदांनाही वाढीव आयात कराला तोंड द्यावे लागेल.

याशिवाय लोखंड, बोरिक अॅसिड, फॉस्फरिक अॅसिड यावरील आयात करातही वाढ करण्यात आली आहे.

बाइकना वगळले

भारताने जागतिक व्यापार संघटनेला गेल्या आठवड्यात एक सूची दिली होती. अमेरिकेच्या ज्या वस्तूंवर सुमारे ५० टक्के अतिरिक्त आयात कर आकारणार आहे त्यांचा तपशील यात देण्यात आला होता. या सूचीमध्ये ८०० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या बाइक्सचाही समावेश होता. मात्र अर्थ मंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये या बाइक्सचा उल्लेख नसल्याने हर्ले डेव्हिडसनसारख्या बाइकवरील गंडांतर टळल्याचे दिसत आहे.

प्रत्येकाचे स्वहित

अमेरिकेने स्वहित जपण्यासाठी चीन, भारतासह अनेक देशांवर अतिरिक्त आयात कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या ५० अब्ज अमेरिकी डॉलर मालावर अतिरिक्त आयात कर लावण्याचा निर्णय अमेरिकेने गेल्या आठवड्यात घोषित केला. यानंतर आणखी पुढे जात चीनच्या २०० कोटी मालावर अतिरिक्त आयात कर लावला जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दिला होता. अमेरिकेच्या या निर्णयाला चीननेही प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेच्या ५० अब्ज अमेरिकी डॉलरच्या मालावर चीननेही तेवढाच अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पाठोपाठ आता भारतानेही हा निर्णय घेतल्याने अमेरिकेला मोठा झटका बसला आहे.

भारताचा हा निर्णय अपेक्षित आहे. वाढीव करांचे प्रमाण मात्र अनपेक्षित आहे. या वाढीमुळे आयात वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल व साहजिकच देशी उत्पादकांची मागणी वाढेल.

- एम. एस. मणी

डेलॉइट इंडिया

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज