अ‍ॅपशहर

करोनामुळे नोकरी जाण्याची भीती ; हे वाचा

करोनामुळे केवळ असंघटीतच नव्हे तर काॅर्पोरेट आणि कंत्राटी अशा सर्व प्रकारच्या नोकऱ्यांची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. काही क्षेत्रांत नोकर कपातीला सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे लाखो नोकऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अशा नोकरदारांना जाॅब लाॅस इन्शुरन्स संजीवनी ठरणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2020, 1:29 pm
मुंबई : करोना व्हायरस संपूर्ण जगाला संकटात टाकलं आहे. लाॅकडाऊनमुळे उत्पादन ठप्प असून अर्थव्यवस्था महामंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा आर्थिक संकटात कंपन्यांनी वेतन कपात, मनुष्यबळ कपातीची सुरुवात केली आहे. ज्यांना नोकरी जाण्याची भीती आहे, अशा नोकरदारांना जाॅब लाॅस इन्शुरन्स पाॅलिसी फायदेशीर ठरु शकते. जाणून घेऊया काय आहे जाॅब लाॅस इन्शुरन्स.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम unemployment


जनरल इन्शुरन्स कंपन्यांकडून जाॅब लाॅस इन्शुरन्स दिला जातो. तडकाफडकी नोकरी गेल्यास नोकरदाराला मासिक खर्च भागवण्यासाठी विमा कंपन्यांकडून जाॅब लाॅस इन्शुरन्समध्ये आर्थिक सुरक्षा पुरवली जाते. मात्र नोकरी गमावल्यानंतर आणि पुन्हा नवीन मिळेपर्यंत या विम्यावर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही. यासाठी काही अटी आणि शर्थी आहेत.

तसं पाहिलं तर कोणतीच जनरल इन्शुरन्स कंपनी जाॅब लाॅस इन्शुरन्स स्वतंत्रपणे देत नाही. ही पाॅलिसी अपघात संरक्षण विमा, किंवा गंभीर आजारासाठीच्या विम्यासोबत अतिरिक्त (म्हणजे अॅडआॅन ) जाॅब लाॅस इन्शुरन्स दिला जातो. जाॅब लाॅस इन्शुरन्सवर आर्थिक सुरक्षा देण्याबाबत कंपन्यांची नियमावली आहे.

या घटनांमध्ये जाॅब लाॅस इन्शुरन्स मिळत नाही

- कंपनीचे अधिग्रहण किंवा विलीनीकरण होताना जर नोकरी गेली तर त्यावर विमा सुरक्षा मिळत नाही.

- जर एखादी व्यक्ती व्यावसायिक असेल आणि त्याचा व्यवसाय नुकसानीत गेल्यामुळे तो बेरोजगार झाल्यास त्यावर देखील जाॅब लाॅस इन्शुरन्सची सुरक्षा दिली जात नाही.

- स्वत:हून राजीनामा दिला तर विमा सुरक्षा मिळत नाही.

- नोकरीचा कालावाधी पूर्ण होण्यापूर्वी निवृत्त झाल्यास नोकरदार जाॅब लाॅस इन्शुरन्ससाठी अपात्र ठरतो.

- नोकरीच्या कालावधीत खराब कामगिरीमुळे नोकरीवरून काढल्यास विम्यासाठी अपात्र ठरवले जाते.

- नोकरीच्या उमेदवारीच्या काळात (probation) कामावरून काढून टाकल्यास जाॅब लाॅस इन्शुरन्स मिळणार नाही.


जाॅब लाॅस इन्शुरन्समध्ये मिळणारे सुरक्षा

- जर अचानक नोकरी गेल्यास आणि तुमच्याकडे जाॅब लाॅस इन्शुरन्स असेल तर विमा कंपनी आपल्या खर्चांची तजवीज करेल.

- आपल्यावरील तीन मोठे कर्जाचे हप्त्यांचा भार (EMI) विमा कंपनी उचलेल. ही रक्कम आपल्या वेतनाच्या निम्मी असेल.

- जाॅब लाॅस इन्शुरन्समध्ये एक ते तीन महिन्यांचा प्रतिक्षा कालावधी असतो. त्यानंतर पाॅलिसीचे लाभ सुरु होतात. पाॅलिसीच्या कालावधीत एक वेळा क्लेम करता येऊ शकतो.

या गोष्टींची खातरजमा करणे आवश्यक

- प्रत्येक कंपनीची जाॅब लाॅस इन्शुरन्सबाबत वेगवेगळ्या अटी आणि शर्थी आहेत. त्यामुळे हा विमा घेण्यापूर्वी नोकरदाराने कंपनीच्या कामावरून कमी करतानाची प्रकिया, मिळणारी नुकसान भरपाई यांची माहिती घेणे आवश्यक आहे.

- जर कंपनीने रितसर नुकसान भरपाई दिली तर जाॅब लाॅस इन्शुरन्ससाठी क्लेम करता येतो का ?

- कामावरुन कमी करण्यापूर्वी कंपनीला नोटीस दिली तर क्लेम मिळेल का ?

- नोकरीवरुन कमी केलं मात्र त्याचा कोणताही पुरावा नसेल तर जाॅब लाॅस इन्शुरन्स मिळेल का याची खातरजमा करणे आवश्यक आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज