अ‍ॅपशहर

मानसी किर्लोस्कर 'यंग बिझनेस चॅम्पियन'

किर्लोस्कर सीस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी किर्लोस्कर यांची संयुक्त राष्ट्राच्या भारतातील पहिल्या 'यंग बिझनेस चॅम्पियन' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Oct 2018, 9:05 pm
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम MANASI-KIRLOSKAR


किर्लोस्कर सीस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी किर्लोस्कर यांची संयुक्त राष्ट्राच्या भारतातील पहिल्या 'यंग बिझनेस चॅम्पियन' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्राने शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी जो कार्यक्रम निश्चित केला आहे त्याला भारतात चालना देण्यासाठी मानसी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. भारतातील एखाद्या युवा उद्योजिका महिलेला अशाप्रकारे पहिल्यांदाच हा सन्मान मिळाला आहे.

मानसी किर्लोस्कर या उदयोन्मुख उद्योजिका आहेत. शाश्वत विकासाचे ध्येय (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स) गाठण्याच्या दृष्टीने आवश्यक कुशलता त्यांच्यात आहे. आपल्या सहकाऱ्यांना व्यवसाय पूरक बनवण्याची अनोखी क्षमता त्यांच्यात आहे. त्यातूनच अन्य युवा उद्योजकांनाही प्रेरणा मिळत असल्याचे या नियुक्तीच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आले आहे. विकासात उद्योगांचं जे महत्त्व आहे त्यावर लक्ष केंद्रित करताना संयुक्त राष्ट्रांसोबत हवामान बदल, प्लास्टिकमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरणा या विषयांवरही त्या काम करणार आहेत. यूएन-इंडिया बिझनेस फोरमचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठीही त्यांचा हातभार लागणार आहे.

संयुक्त राष्ट्रांसोबत यंग बिझनेस चॅम्पियन म्हणून काम करण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी फार मोठा बहुमान असल्याची भावना मानसी यांनी व्यक्त केली आहे. या जबाबदारीसोबत सामाजिक उत्तरदायित्वही माझ्यावर आलं आहे. एसडीजी ही येणाऱ्या पिढीसाठी मोठी संधी आहे. भारताच्या सर्वांगिण विकासात सहभागी होण्याची सुवर्णसंधी याद्वारे मिळत आहे, असेही मानसी म्हणाल्या. कोणत्याही उद्योगत शाश्वत विकासाला गती देण्याची क्षमता निश्चितच असते आणि तोच संदेश घेऊन मी माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडणार आहे. युवा उद्योजकांमध्ये हा संदेश पोहोचवण्याचे काम करणार आहे, असे मानसी म्हणाल्या.

भारतातील संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक युरी अफनासेव यांनी मानसी यांच्या नियुक्तीचे स्वागत केले. मानसी यांच्या सहभागामुळे शाश्वत विकासातील उद्योगांचे महत्त्व पटवून देण्यात आम्ही अधिक यशस्वी होऊ, असा विश्वास युरी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जागतिक पातळीवर गरिबी दूर करण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक सर्वांगिण विकासासाठी १७ विविध प्रकारचे गोल्स संयुक्त राष्ट्रांनी 'सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स' या कार्यक्रमांतर्गत निश्चित केलेले आहेत. भारतात हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मानसी किर्लोस्कर या युवा उद्योजिकेची निवड करण्यात आल्याने हा एक बहुमानाचाच क्षण आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज