अ‍ॅपशहर

नोकरी बदलताच ‘पीएफ’चे हस्तांतर

देशभरातील संघटित क्षेत्रातील नोकरदारांसाठी आनंदाची बातमी असून, पुढील महिन्यापासून नोकरी बदलताच संबंधिताच्या भविष्यनिर्वाह निधी खात्याचे (पीएफ अकाउंट) हस्तांतर होणार आहे. मुख्य भविष्यनिर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी ही माहिती दिली.

Maharashtra Times 12 Aug 2017, 4:19 am
अर्ज करण्याची गरज नाही; तीन दिवसांतच रक्कम मिळणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम provident fund transfer without application from next month
नोकरी बदलताच ‘पीएफ’चे हस्तांतर


इटी वृत्त, नवी दिल्ली

देशभरातील संघटित क्षेत्रातील नोकरदारांसाठी आनंदाची बातमी असून, पुढील महिन्यापासून नोकरी बदलताच संबंधिताच्या भविष्यनिर्वाह निधी खात्याचे (पीएफ अकाउंट) हस्तांतर होणार आहे. मुख्य भविष्यनिर्वाह निधी आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी ही माहिती दिली.
गेल्या काही वर्षांपासून एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’ची (ईपीएफओ) कार्यपद्धती कर्मचाऱ्यांना अनुकूल करण्यावर सातत्याने भर देण्यात येत आहे. नोकरी बदलल्यानंतर पीएफ खाती बंद होण्याचे प्रमाण वाढले असून, कर्मचाऱ्यांना अधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे जॉय यांनी नमूद केले. ‘ज्या वेळी एखादा कर्मचारी नोकरी सोडतो, त्या वेळी आधीच्या कंपनीतील पीएफ खाते सर्रास बंद करण्यात येते. नव्या ठिकाणी तो रुजू झाल्यानंतर पुन्हा पीएफ खात्याची प्रक्रिया पार पाडून नवे खाते सुरू करण्यात येते. नव्या खात्यांसाठी आम्ही आता आधार कार्ड अनिवार्य केले आहे. जुनी खाती बंद पडू नयेत, ती कायमस्वरूपी सुरूच राहावीत, अशीच आमची इच्छा आहे. आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान एक तरी पीएफ खाते चालू ठेवावे,’ अशी भूमिका जॉय यांनी स्पष्ट केली.
पुढील महिन्यापासून एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यास कोणताही अर्ज न करताच त्याचा भविष्यनिर्वाह निधी केवळ तीन दिवसांतच हस्तांतर करण्यात येईल. भविष्यातही या प्रक्रियेचा फायदा होईल. ज्या सभासदाकडे आधार कार्ड क्रमांक असेल, तो देशाच्या कोणत्याही भागात कार्यरत असेल; त्याने अर्ज न करताच भविष्यनिर्वाह निधी हस्तांतर केला जाईल. लवकरच ही प्रक्रिया सर्वत्र लागू होणार आहे, असेही जॉय यांनी स्पष्ट केले. या शिवाय ‘ईपीएफओ’ने देशभर कार्यालयांचे जाळे विस्तारण्याचा वेगही वाढवला असल्याचे ते म्हणाले. जानेवारी ते जून २०१७ या कालावधी संघटनेतर्फे आयोजित एका अभियानातून नवे एक कोटी सभासद जोडले गेले आहेत. आता सेवेचा स्तर सुधारण्यावर आमचा भर असल्याचेही जॉय म्हणाले.

भविष्यनिर्वाह निधीतील रक्कम केवळ घर, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आदींसाठीच वापरली जाणे इष्ट आहे. जेणेकरून प्रत्येक सभासदाला सामाजिक सुरक्षा प्राप्त होईल. या पार्श्वभूमीवर लवकरच आम्ही सभासद जागृती अभियान हाती घेणार आहोत.
व्ही. पी. जॉय,
केंद्रीय भविष्यनिर्वाह निधी आयुक्त

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज