अ‍ॅपशहर

रेपो दर जैसे थे

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या कारकीर्दीतील पतधोरणाचा शेवटचा द्विमाही आढावा मंगळवारी सादर करण्यात आला. यामध्ये रिझर्व्ह बँकेने कोणताही दरबदल केलेला नाही. रेपो व रिव्हर्स रेपो दर पूर्वीप्रमाणेच अनुक्रमे ६.५० व ६ टक्के ठेवण्यात आले आहेत. सीआरआरही ४ टक्केच ठेवण्यात आला आहे.

Maharashtra Times 10 Aug 2016, 3:00 am
रिझर्व्ह बँकेतर्फे कोणताही दरबदल नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajan maintains status quo on policy rates
रेपो दर जैसे थे


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या कारकीर्दीतील पतधोरणाचा शेवटचा द्विमाही आढावा मंगळवारी सादर करण्यात आला. यामध्ये रिझर्व्ह बँकेने कोणताही दरबदल केलेला नाही. रेपो व रिव्हर्स रेपो दर पूर्वीप्रमाणेच अनुक्रमे ६.५० व ६ टक्के ठेवण्यात आले आहेत. सीआरआरही ४ टक्केच ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे कॉर्पोरेट बाँडविषयक मार्गदर्शक तत्त्वे २५ ऑगस्ट रोजी जाहीर केली जातील, अशी घोषणा यावेळी डॉ. राजन यांनी केली.

रिझर्व्ह बँकेने महागाई दर ५ टक्के राहिल, असे गृहित धरले आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे कदाचित महागाई वाढू शकते अशी भीती राजन यांनी व्यक्त केली. कोणताही दरबदल न करणे ही काळाची गरज असल्याचे सांगून राजन म्हणाले, अर्थव्यवस्थेची वाटचाल कशी होते याकडे बँक लक्ष ठेवून आहे. यंदा मान्सून चांगला होईल, असा विश्वास आहे. डाळींचे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्यामुळे डाळींच्या किमती भविष्यात खाली येतील. तसेच चांगल्या मान्सूनचा परिणाम दीर्घकाळ दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एनपीए स्वच्छता समाधानकारक

अनुत्पादक मत्ता अर्थात एनपीए आहे हे सरकारी बँकांनी स्वीकारले आहे, ही महत्त्वाची गोष्ट असल्याचे सांगून डॉ. राजन म्हणाले, एनपीए कमी करण्यासाठी आर्थिक ताळेबंद स्वच्छ करण्याचा बँकांनी चालवलेला प्रयत्न उल्लेखनीय आहे. ही चांगली सुरुवात आहे. याविषयी रिझर्व्ह बँकेने मार्च २०१७पर्यंतचा आराखडा तयार केला आहे. एनपीए खरेदी करण्यात काही कंपन्यांकडून स्वारस्य दाखवले जात आहे. मार्च २०१७पर्यंत बँकांकडून त्यांचा आर्थिक ताळेबंद स्वच्छ करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बनावट ईमेलपासून सावधान

सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडून पैसे उकळणाऱ्या बनावट ईमेलना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन डॉ. रघुराम राजन यांनी केले. रिझर्व्ह बँक किंवा आपण स्वतः कोणत्याही नागरिकाकडून पैशांची मागणी करत नाही तसेच कोणाला पैसे देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व्ह बँक चलनी नोटा छापत असली तरी त्या थेट लोकांना वितरित करत नाही, असा नर्मविनोदही त्यांनी केला. पुढील वर्षभरासाठी ग्राहक संरक्षक आणि केवायसी मोहीम सुरू करत असल्याची घोषणा राजन यांनी केली. ते म्हणाले, केवायसीचे नियम आता रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एखाद्या बँक शाखेला केवायसी नियमांची माहिती नसल्यास लोकांनी ती रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर असल्याचे लक्षात आणून द्यावे. हीदेखील एकप्रकारे जनसेवाच आहे, याकडे राजन यांनी लक्ष वेधले.

प्रत्येक क्षणाचा आनंद

आपली कारकीर्द उत्तम असल्याचे व आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेतल्याचे डॉ. राजन यांनी सांगितले. ते म्हणाले, कोणत्याही पदावर तुम्ही असलात तरी तुमच्यावर टीका करणारे असतातच. मी व माझ्या डेप्युटी गव्हर्नरांनी मिळून प्रत्येक निर्णय घेतला, ज्याची फळे येत्या ५-६ वर्षांत दिसू लागतील. टीकाकारांनी केलेल्या टीकेपेक्षा देशासाठी काही करता आले याचे समाधान मोठे आहे. रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत योजलेले उपाय बरोबर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज