वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेने आपल्या राखीव सोनेसाठ्यातील आठ हजार कोटी रुपयांचे सोने विकल्याचे वृत्त निराधार ठरले आहे. रिझर्व्ह बँकेने रविवारी या वृत्ताचे खंडन केले.
'रिझर्व्ह बँकेने ३० वर्षांत प्रथमच आपल्या साठ्यातील राखीव सोन्याची विक्री केल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र यात तथ्य नसून आम्ही सोन्यासंबंधी कोणत्याही प्रकारे विक्री वा अन्य व्यवहार केलेला नाही,' असे आरबीआयने रविवारी ट्वीटद्वारे स्पष्ट केले. आरबीआयने ५.१ अब्ज अमेरिकी डॉलरचे सोने खरेदी केले तर, १.१५ अब्ज अमेरिकी डॉलरचे सोने विकले, असे या वृत्तांमध्ये म्हटले होते.
जगातील सर्व देशांच्या प्रमुख बँका आपल्या विदेशी चलनातील काही हिस्सा हा सोन्याच्या रूपात गुंतवतात. यानुसार आरबीआयने नोव्हेंबर २०१७पासून सुमारे २० लाख औंस सोनेखरेदी केली आहे.