अ‍ॅपशहर

ईपीएफ जमेचा मागोवा

तुम्ही नोकरी करत असलेल्या कंपनीत २०पेक्षा अधिक कर्मचारी असतील तर तुमच्या वेतनातील काही भाग कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) म्हणून दरमहिना बाजूला काढून घेतला जाईल.

Maharashtra Times 13 Jan 2018, 1:22 am
तुम्ही नोकरी करत असलेल्या कंपनीत २०पेक्षा अधिक कर्मचारी असतील तर तुमच्या वेतनातील काही भाग कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) म्हणून दरमहिना बाजूला काढून घेतला जाईल. तुमचे मूळ वेतन ६५०० रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला ईपीएफ लागू होतो. मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम ही तुमच्या ईपीएफ खात्यात तुम्ही व तुमची कंपनी यांच्याकडून घातली जाते. यातील तुमची १२ टक्के रक्कम संपूर्णतः ईपीएफ खात्यात जाते. कंपनीच्या १२ टक्क्यांपैकी ३.६७ टक्के रक्कम ईपीएफमध्ये जाते तर, उर्वरित ८.३३ टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत (ईपीएस) जाते. ईपीएफ खाते व त्यातली रकमेचा मागोवा ऑनलाइन घेता येतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tracking epf credit
ईपीएफ जमेचा मागोवा


चार प्रकारे मागोवा

ईपीएफ खात्यात नेमकी किती रक्कम जमा आहे याचा मागोवा चार प्रकारांनी घेता येतो. आता तर तुम्हाला केव्हाही ही जमा रक्कम पाहता येते. या रकमेचा मागोवा घेणे आणि त्यायोगे अद्ययावत राहणे गरजेचे आहे. ही प्रत्येक कर्मचाऱ्याची नोकरीच्या काळात, त्याच्या निवृत्तीपश्चात जीवनासाठी जमवलेली पुंजी असते. ही पुंजी पाहण्याचे मार्ग असे –
- ईपीएफओ पोर्टलद्वारे
- ईपीएफओला एसएमएस पाठवून विचराणा करून
- ईपीएफओने दिलेल्या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन
- ईपीएफओ अॅप वापरून

ईपीएफओ पोर्टलद्वारे मागोवा
- पोर्टलवर जाऊन ईपीएफ रक्कम पाहण्यापूर्वी तुमचा युनिव्हर्सल अकाउन्ट नंबर अर्थात यूएएन कार्यरत आहे ना याची खात्री करा.
- प्रत्येक कर्मचाऱ्याला, त्याने कितीही नोकऱ्या बदलल्या तरी एकच यूएएन देण्यात येतो हे लक्षात घ्या.
- यूएएन नंबर कार्यरत झाल्यावर या पायऱ्यांनी रक्कम पहा –
१. ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या http://www.epfindia.com या पोर्टलवर जा. येथे अवर सर्व्हिसेसवर क्लिक करून नंतर फॉर एम्प्लॉइजवर क्लिक करा.
२. आता सर्व्हिसेस पर्यायांतर्गत मेंबर पासबुकवर क्लिक करा.
३. या लॉगइन पेजवर तुमचा यूएएन क्रमांक टाइप करा, पासवर्ड व कॅप्चा टाइप करून लॉगइन प्रक्रिया पूर्ण करा.
४. ईपीएफ खात्याचा मागोवा घेऊन त्यातील रक्कम तपासा.

एसएमएसद्वारे मागोवा –
यासाठी तुमचा यूएएन क्रमांक तुमच्या केवायसी तपशीलासोबत संगल्न असायला हवा. हा केवायसी तपशील तुमच्या बँक खात्याला दिलेल्या तपशीलाशी, ‘आधार’शी किंवा ‘पॅन’शी जुळणारा असावा. याची खात्री झाल्यावर खालील प्रक्रिया पूर्ण करा –
१. प्रथम तुमच्या मोबाइलवरून ७७३८२९९८९९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवा.
२. हा एसएमएस पाठवताना तो EPFOHO UAN ENG असा टाइप करून पाठवणे गरजेचे आहे. यातील यूएएनच्या जागी यूएएन क्रमांक टाका. या नमुना एसएमएसमधील ENG ही अक्षरे भाषा दर्शवतात. तुम्हाला एसएमएस मराठीतून हवा असल्यास ENG ऐवजी MAR टाइप करून एसएमएस पाठवा.

मिस्ड कॉलने मागोवा –
तुमचा यूएएन क्रमांक कार्यरत असेल व त्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर तुम्ही केवळ एक मिस्ड कॉल देऊन मागोवा घेऊ शकता. यासाठी हे करा –
१. ईपीएफओकडे नोंदणीकृत असलेल्या तुमच्यामोबाइल क्रमांकावरून ०११-२२९०१४०६ या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.
२. मिस्ड कॉल दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीएफचा तपशील एसएमएसद्वारे येईल.

अॅपच्या साह्याने मागोवा –
१. तुमचा यूएएन कार्यरत असेल तर तुम्ही गुगल प्लेस्टोअरवरून m-sewa app of EPFO हे मोबाइल अॅप डाउनलोड करा.
२. अॅप डाउनलोड झाल्यावर ते उघडून त्यातील मेंबरवर क्लिक करून नंतर बॅलन्स/पासबुक यावर क्लिक करा.
३. त्यानंतर तुमचा यूएएन क्रमांक व नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाइप करा. हे दोन्ही एकमेकांशी जुळल्यानंतर तुमचा पीएफ तुम्हाला तुमच्या मोबाइल स्क्रिनवर दिसेल.
(स्रोत : ईपीएफओ)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज