अ‍ॅपशहर

नर्सरी शिक्षकांना ‘बीएड’ची अट

नर्सरी शिक्षकांना ‘बीएड’ची अट...नवीन शिक्षण धोरणातील महत्त्वाची तरतूद, बीएड अभ्यासक्रमही एकात्मिक...

Authored byनीरज पंडित | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2020, 7:42 pm
मुंबई : विद्यार्थ्यांना तणावमुक्त आणि कल्पक शिक्षण मिळावे, या उद्देशाने नवीन शिक्षण धोरणात देशाच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचा बदल हा पूर्व प्राथमिक शिक्षणात करण्यात आला आहे. या वर्गांमध्ये शिक्षण देणारे शिक्षक आता 'बीएड' पदवीधारक असतील, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळू शकणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nep 2020 condition of b ed for nursery teachers
नर्सरी शिक्षकांना ‘बीएड’ची अट


नवीन शिक्षण धोरणानुसार सध्याची १०+२ ही शिक्षण रचना आता ५+३+३+४ अशी करण्यात आली आहे. यामध्ये पहिली पाच वर्षे ही पूर्व प्राथमिकची तीन वर्षे आणि पहिली व दुसरी असे आहे. आत्तापर्यंत पूर्व प्राथमिकसाठी शिकविणाऱ्या शिक्षकांना बालवाडी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट होती. आता मात्र हे शिक्षक बीएड पदवीधारक असणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात त्यांचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे धोरण समितीच्या सदस्य आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत यांनी स्पष्ट केले.

यामुळे 'बीएड'च्या शिक्षणातही आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. 'बीएड'ची पदवी ही आता एकात्मिक करण्यात आली असून, बारावीनंतर चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम असणार आहे. बारावीनंतर आता विद्यार्थ्यांना आणखी एक करिअरची वाट धरता येणार आहे. यामध्ये अध्यापन कौशल्यासह विविध विषयांचे शिक्षण देऊन बहुआयामी शिक्षक घडविला जाणार आहे. याबाबत अधिक स्पष्टता २०२१मध्ये तयार होणाऱ्या 'शिक्षक शिक्षण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्या'तून येणार आहे. हा आराखडा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद तयार करणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील हे एक उत्तम पाऊल असल्याचे मत पुण्यातील आदर्श शिक्षण मंडळीच्या आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन कॉलेजच्या मुख्याध्यापक डॉ. ललिता वर्तक यांनी व्यक्त केले आहे.

नवं शिक्षण धोरण रोजगारक्षम कौशल्य विकसित करणारे: कस्तुरीरंगन

चांगले शिक्षक घडतील

एकात्मिक अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थी ठरवून बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील. यामुळे त्यांच्याकडून नक्कीच चांगले शिक्षण घेतले जाईल आणि ते उत्तम शिक्षक बनू शकतील, असेही त्या म्हणाल्या. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारा शिक्षक हा तरुण असेल. यामुळे त्यात अधिक उर्जा असेल तसेच, तो डिजिटली साक्षर असेल. यामुळे येत्या काळात येणाऱ्या शैक्षणिक बदलांनाही तो सहज सामोरे जाऊ शकेल, असेही डॉ. वर्तक म्हणाल्या. या सर्वाचा परिणाम हे शिक्षक अध्यपन करताना होणार असून, लहान मुलांना उत्तम शिक्षण मिळू शकेल, असा विश्वासही डॉ. वर्तक यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज