अ‍ॅपशहर

प्रेरणादायी! अंगठा गमावूनही दीक्षाने मि‌ळविले दहावीत ९६ टक्के

ऐन दहावीच्या तोंडावर अपघातात उजव्या हाताचा अंगठा गमवावा लागला. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वर्षात कसे होईल, असा प्रश्न निर्माण झाला.

महाराष्ट्र टाइम्स 30 Jul 2020, 3:08 pm
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur student


ऐन दहावीच्या तोंडावर अपघातात उजव्या हाताचा अंगठा गमवावा लागला. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वर्षात कसे होईल, असा प्रश्न निर्माण झाला. पण, कुठेही न डगमगता याविरुद्ध लढा द्यायचा, असा निश्चयच दीक्षा मंगरानी हिने केला. सर्व अडचणींवर मात करीत यशही मिळवून दाखविले. दीक्षाने अपघातातून बरे झाल्यावर दोन महिन्यांत डाव्या आणि उजव्या हातांच्या तीन बोटांनी लिहिण्यास सुरुवात केली. सुरुवातीला झालेल्या त्रासातून सावरत आपल्या मेहनतीच्या जोरावर ९६.४ टक्के गुण मिळवत दीक्षा इतरांसाठी प्रेरणा ठरली आहे.

नववीत असताना दीक्षाला एका बाइकस्वाराने धडक दिली. अपघातात तिच्या उजव्या हाताचा अंगठा मागच्या चाकात आला. यावेळी तिच्या अंगठ्याला टाके पडले. मात्र, योग्य उपचार न झाल्याने शेवटी अंगठ्याला गँगरिन झाले व तो कापावा लागला. लिहिताना अंगठा नसल्यास काय होते, याची प्रचीती दीक्षाला येऊ लागली. मात्र, मनाशी ठाम निश्‍चय करून तिने चक्क डाव्या आणि उजव्या हाताच्या बोटांच्या मदतीने लिहिण्यास सुरुवात केली. काही महिन्यातच एका विशिष्ट गतीने लिहिण्यात तिने यश मिळवले. शिवाय, एकाच हाताने न लिहिता दोन्ही हातांनी लिहिण्याचे कौशल्यही आत्मसात केले. या कौशल्यातूनच तिने दहावीचा पेपर दिला. आत्मविश्‍वास आणि प्रयत्न केल्याने कशावरही मात करता येते, असे दीक्षाचे म्हणणे आहे. भविष्यात तिला प्रशासकीय सेवेत जायचे आहे. दीक्षाचे वडील रमेश मंगरानी ऑटोचालक आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज