बदल हळूहळू करा...
सुट्टीच्या या काळात आपली परीक्षा कशी झाली, कोणता पेपर कसा गेला किंवा निकाल काय लागेल, असा कोणताही विचार करू नका. आपलं दैनंदिन जीवन त्वरित बदलण्याची गरज नाही. त्याऐवजी याच वेळेत करण्यासारखी इतर दुसरी कामं करा. जर तुम्हाला सकाळी लवकर उठून अभ्यास करायची सवय होती, तर आताही तसंच लवकर उठा आणि अभ्यासाऐवजी व्यायाम करा. व्यायामामुळे तुमच्या आरोग्याला तर फायदा होईल, पण मुख्य म्हणजे तुमचं शरीर पटकन या बदलाशी जुळवून घेऊ शकेल.
खेळ, छंद...
हळूहळू आपल्या आधीच्या सवयी सोडवण्याचा प्रयत्न करून आराम करायला शिका. रोज-रोज एकच गोष्ट केल्यानं त्याचा कंटाळा येऊ शकतो. अति उत्साहानं किंवा घाईघाईत कोणतीही गोष्ट करू नका. तुमच्या एखाद्या आवडत्या खेळाचं (स्पोर्ट्स/अॅक्टिव्हीटी) प्रशिक्षण घेता येईल किंवा नृत्य/गाणं किंवा एखादी कला शिकणं यासारखा तुमचा एखादा छंद या काळात जोपासता येईल. यामुळे तुमच्यातील कलाकार तुम्हाला घडवणं शक्य होईल.
जे-जे करावंसं वाटत होतं...
आपल्या कुटुंबाबरोबर, मित्र-नातेवाईक यांच्याबरोबर छान वेळ घालवता येईल. घरातील छोटी-मोठी कामं करण्यात आई-वडिलांना मदत करता येईल. ही कामं करणं म्हणजे कमीपणा येण्यासारखं अजिबात नाही, हे लक्षात घ्या. अभ्यास करताना तुम्हाला जे-जे काही करावंसं वाटत होतं, पण अभ्यासामुळे ते तेव्हा शक्य नव्हतं अशा गोष्टी करण्यासाठी तुम्ही आता वेळ देऊ शकता.
करिअरचं प्लॅनिंग
दहावी-बारावीनंतर पुढे काय करायचं, याचा विचार करा आणि त्या दृष्टीनं करिअरचं प्लॅनिंग करण्यास सुरुवात करा, माहिती गोळा करा. फक्त झोपा काढण्यात तुमचा वेळ घालवू नका किंवा तुमचा वेळ फुकटही घालवू नका. एक लक्षात घ्या की, या सुट्टीची तुम्ही कधीपासून वाट पाहिली आहे. मग सुट्टीचा हा वेळ वाया न घालवता तिचा अधिकाधिक फायदा आपण घ्यायला हवा. नवीन गोष्टी शिकायला हव्यात आणि त्याचबरोबर या सुट्टीचा आनंदही लुटायला हवा!