अ‍ॅपशहर

एमपीएससी पूर्व परीक्षा : इतिहास १

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९च्या अनुषंगाने आपण आतापर्यंतच्या लेखात दोन्ही परीक्षांच्या तुलनात्मक अभ्यासक्रमाची माहिती बघितली आहे. दोन्ही परीक्षांमधील अभ्यासक्रमांमधील समानता आणि फरक याविषयी चर्चा केली आहे.

Maharashtra Times 29 Nov 2018, 10:44 am
अमित संतोषराव डहाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम history


राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९च्या अनुषंगाने आपण आतापर्यंतच्या लेखात दोन्ही परीक्षांच्या तुलनात्मक अभ्यासक्रमाची माहिती बघितली आहे. दोन्ही परीक्षांमधील अभ्यासक्रमांमधील समानता आणि फरक याविषयी चर्चा केली आहे. आता सामान्य अध्ययन या विषयातील घटकांची दोन्ही परीक्षांमधील प्रश्नांच्या आधारे घटकनिहाय विस्तृत माहिती पाहू या.

सामान्य अध्ययनात दोन्ही परीक्षांमध्ये इतिहास हा घटक गुणांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेत २०१३पासून ते २०१८पर्यंत साधारणता १५ ते १८ प्रश्न या घटकांवर विचारलेले दिसतात. २०१३पासून यूपीएससीच्या धर्तीवर बदललेल्या एमपीएससीच्या अभ्यासक्रमामुळे आयोगाने प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासदर्शक प्रश्नांचा समावेश परीक्षेमध्ये केलेला दिसतो. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत भारताचा आधुनिक इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास या उपघटकांवरच प्रश्न विचारलेले गेले आहेत. म्हणजेच भारताचा प्राचीन इतिहास आणि भारताच्या मध्ययुगीन इतिहासावर संयुक्त पूर्व परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले नाहीत.

प्राचीन व मध्ययुगीन इतिहास : भारताच्या प्राचीन इतिहासात, प्राचीन काळातील संस्कृती, कुठे व कशा विकसित झाल्या, प्रामुख्याने सिंधू, हडप्पा, आर्यांच्या पूर्वीचे लोक, त्यांची नगररचना, शेतीपद्धत पशू, उपजीविकेचे साधन, त्यांच्या कला, वास्तूशास्त्र, भांडी, उत्खननात सापडलेल्या वस्तू, ठिकाणे; तसेच या काळातील राज्ये, साम्राज्ये; त्यांच्या स्थापना प्रमुख वै‌शिष्ट्ये, बौद्ध व जैन धर्माचा उदय, धर्माचे तत्त्व, प्रसार व ऱ्हास या संबंधी अभ्यास या उपघटकात करणे क्रमप्राप्त ठरते.

प्रश्न : खालील विधनांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा (२०१८)

अ) महाराष्ट्रातील जोर्वे, निवासा, दायनाबाद, चांडोली, सोनगाव, ज्ञानमगांव, प्रकाश, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

ब) राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्य प्रदेशातील माळवा, कायथा, एरण इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

१) दोन्ही विधाने बरोबर आहेत. २) दोन्ही विधाने चुकीची आहेत. ३) विधान अ बरोबर आहे; परंतु विधान ब चुकीचे आहे. ४) विधान ब बरोबर आहे; परंतु विधान अ चुकीचे आहे.

उत्तर : १ बरोबर आहे. दोन्ही विधाने योग्य आहेत.

मानवाने सर्वप्रथम उपयोगात आणलेला धातू म्हणून तांबे हा धातू ओळखला जातो. दगडाच्या व तांब्याच्या उपकरणांचा वापर अनेक संस्कृतीचा पाया बनला. अशी संस्कृती ताम्रपाषाण संस्कृती म्हणून ओळखली जाऊ लागली. या ताम्रपाषाण संस्कृतीची ठिकाणे उत्खननात कोठे कोठे आढळली गेली, भारतासह महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले, याबद्दल माहिती वरील प्रश्नात विचारली आहे.

प्रश्न : खालील विवरणांवरून व्यक्ती ओळखा. (२०१८)

अ) विशाल साम्राज्याचा संस्थापक

ब) सुसंस्कृत, विद्वान, आणि कवी

क) प्रसिद्ध कवी ‌हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्ध पंडित वसुबंधू त्यांच्या दरबारात होता.

ड) भारतीय नेपोलियन अशी विन्सेट स्मिथ त्याची प्रशंसा करतात.

१) हरिसेन २) कनिष्क ३) समुद्रगुप्त ४) चंद्रगुप्त मौर्य

उत्तर : ३. या प्रश्नाच्या आधारे भारतातील प्राचीन काळातील साम्राज्ये, त्यांचे संस्थपक त्यांची वै‌शिष्ट्ये, हे आयोगाने विचारलेले आहे.

प्रश्न : खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या 'धम्म'ची माहिती आहे?

१) छोटे शिलालेख २) भाब्रुशिलालेख ३) कलिंग शिलालेख ४) चौदा शिलालेख

उत्तर : १. या प्रश्नाच्या आधारे प्राचीन सम्राट, राजे त्यांच्या कला, धर्म प्रचाराविषयी या बाबतची माहिती विचारलेली दिसते.

प्रश्न : पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? (२०१८)

१) दुसरा चंद्रगुप्त २) समुद्रगुप्त ३) कुमारगुप्त ४) स्कंदगुप्त

उत्तर : क्र. ३. या प्रश्नात प्राचीन राजांविषयीची माहिती विचारलेली दिसते.

उपरोक्त उल्लेखलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला असे लक्षात येते, की प्राचीन भारताच्या इतिहासावर पूर्व परीक्षेत आयोग हमखास प्रश्न विचारते. यामध्ये अश्मयुग, हडप्पा संस्कृती, ताम्रपाषाण संस्कृती, वैदिक कालखंड, जसे अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, इत्यादी उत्तर वैदिक महाजनपदे, मौर्य कालखंड, गुप्त कालखंड, बौद्ध धर्म, जैन धर्म, त्यातील साहित्य व धर्माचा प्रचार व प्रसार; तसेच प्राचीन भारतातील तत्त्वज्ञान, कला, स्थापत्य आणि साहित्य, प्राचीन काळात भारतात येऊन गेलेले परदेशी राजे, तत्त्वज्ञ इत्यादी बाबींवर आयोगाने प्रश्न विचारलेले दिसतात.

प्राचीन भारतातवर आयोगाने विचारलेले प्रश्न बऱ्याच वेगवेगळ्या उपघटकांवर विचारलेले असले, तरी या प्रश्नांची खोली फार जास्त नाही. त्यामुळे प्राचीन भारताचा अभ्यास करताना २०१३ ते २०१८ या कालावधीत आयोगाने कोणकोणत्या उपघटकांवर प्रश्न विचारेले आहेत, त्या घटकांचा ठोकळ अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. यासाठी संदर्भ साहित्य म्हणून आधी महाराष्ट्र बोर्डाची क्रमिक पुस्तके वाचणे योग्य ठरेल व नंतर कोणतेही एक पुस्तक सं‌दर्भ साहित्य म्हणून वापरता येईल.

भारताचा प्राचीन इतिहास या उपघटकावर पूर्व परीक्षेत ३ ते ४ प्रश्न विचारलेले दिसतात. या घटकावर मुख्य परीक्षेत प्रश्न विचारले जात नाही. त्यामुळे या घटकांचा अभ्यास करताना गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून अभ्यास करणे उपयुक्त ठरते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज