अ‍ॅपशहर

'ते' ५ जण शस्त्रे घेऊन कारमधून जात होते, नाकाबंदी केली तेव्हा

औरंगाबादमध्ये फुलंब्री येथे नाकाबंदी दरम्यान पाच अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले. ते कारमधून अवैध शस्त्रे घेऊन जात होते. त्यांच्याकडून पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Oct 2020, 4:04 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: बीड येथील काही अट्टल गुन्हेगार एका गाडीतून अवैध शस्त्रे घेऊन जात असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाला मिळाली होती. त्या आधारावर फुलंब्री येथे नाकाबंदी करून पोलिसांनी एका कारमधून ५ अट्टल गुन्हेगारांकडून तीन पिस्तुल आणि १३ जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी पाचही जणांच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या गुन्हेगारांचे नाव संतोष ओंकार गायकवाड, नितीन दत्तायत्र जाधव, शरद सुरेश पुरी, राहुल पुंडलिक बुधनव, मच्छिंद्र ज्ञानदेव सानप असे आहेत. यातील चार जणांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ते ५ जण शस्त्रे घेऊन कारमधून जात होते, नाकाबंदीदरम्यान


या प्रकरणात ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरिक्षक विवेक जाधव यांना अवैधरित्या शस्त्रे घेऊन काही गुन्हेगार जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सोमवारी (२६ ऑक्टोबर) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि फुलंब्री पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी फुलंब्री येथील खुलताबाद टी पॉईंट येथे नाकाबंदी केली. त्यावेळी एक भरधाव कार येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवली. कारमधील ५ जणांना खाली उतरविले. पोलिसांनी या ५ जणांची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी या पाचही जणांची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे ३ पिस्तुल आणि १३ जीवंत काडतुसे सापडली. ती जप्त करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी संतोष ओंकार गायकवाड (रा. बीड), नितीन दत्तायत्र जाधव (रा. गवेराई, बीड), शरद सुरेश पुरी (२७, (रा. बीड), राहुल पुंडलिक बुधनव (२२, रा. खामगाव, बीड), मच्छिंद्र ज्ञानदेव सानप (२६, रा. सावरगाव, बीड) यांच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे पोलीस उपनिरिक्षक विवेक जाधव, फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सम्राटसिंग राजपुत, उपनिरिक्षक डी. आर. वाघमारे, आर एम मुऱ्हाडे, बी. आर. कांबळे, पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार एस. के. दौड, बाबासाहेब नवले, वाय. बी. तरमाळे यांनी केली.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी

नितीन जाधव याच्यावर चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. संतोष ओंकार गायकवाड याच्याविरोधात लुटमारीचे गुन्हे दाखल असून, त्याच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तो अडीच वर्षे तुरुंगात होता, अशी माहिती उघडकीस आली आहे. तर राहुल बुधनव याच्यावर लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच मच्छिंद्र ज्ञानदेश सानप हा सध्या जामिनावर तुरुंगातून सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली.

धक्कादायक! ८ वर्षीय मुलीच्या गालावर दुकानदाराने घेतला चावा मुंबईत हायअलर्ट; दहशतवादी हल्ल्याची शक्यताबॉलिवूड अभिनेत्रीवर मुंबईत प्राणघातक हल्ला

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज