अ‍ॅपशहर

टिळा लावायच्या कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू वापरलं नाही; उच्चशिक्षित तरुणानं लग्न मोडलं

टिळा लावण्याच्या कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू वापरलं नाही म्हणून नवरा मुलगा आणि त्याच्या आई-वडिलांनी लग्नच मोडले. पालघरमधील वाडा तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2021, 3:26 pm
वाडा: लग्न ठरलं. टिळा लावण्याचा कार्यक्रमही झाला. पण या कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू वापरले नाही, म्हणून एका उच्चशिक्षित तरुणाने चक्क लग्नच मोडले. या प्रकरणी नवरा मुलगा, त्याचे आईवडील आणि काकाविरोधात पालघरमधील वाडा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम टिळा लावायच्या कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू वापरलं नाही; उच्चशिक्षित तरुणानं लग्न मोडलं


मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील मुळचे कुटुंब सध्या वसईत राहतं. त्यांनी त्यांच्या सिव्हिल इंजिनीअर मुलाचे लग्न वाडा तालुक्यातील एका उच्चशिक्षित मुलीसोबत ठरवले होते. हे लग्न जमवण्यासाठी मुलाच्या काकाने पुढाकार घेतला होता. त्या अनुषंगाने हे लग्न जमल्यानंतर ३० ते ४० लोकांच्या उपस्थितीत टिळा लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

नवऱ्या मुलाकडील मंडळींचे मुलीच्या वडिलांनी आगतस्वागतही केले. कपड्यांच्या भेटी दिल्या. जेवणही दिले. मात्र दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची तारीख ठरवण्यासाठी नवरी मुलीच्या वडिलांनी नवरा मुलगा आणि त्याच्या काकांना विचारणा केली असता, मुलांनी त्यांना चक्क आपली सोयरीक जमणार नसल्याचे सांगितले. यानंतर नवरीच्या वडिलांनी मुलाच्या काकांना फोन करून कारण विचारले. पण त्यांनी फोन उचलला नाही.

पुणे: गँगस्टर शरद मोहोळ, गजा मारणेला मोठा दणका

यानंतर मुलीचे वडील व एक-दोन नातेवाइक मध्यस्थ यांना घेऊन मुलाच्या वडिलांकडे गेले असता, मुलाचा काका घरात लपून बसला व आलेल्या मध्यस्थांना व मुलीच्या वडिलांना भेटला नाही. यानंतर प्रचंड मानसिक तणावाखाली असणारे मुलीचे वडील व कुटुंबातील व्यक्ती यांनी याबाबत वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी मुलाचे वडील, काकाला पोलीस ठाण्यात बोलावले. पण ते आले नाहीत. नवरा मुलगा व त्याचे नातेवाइक वाडा पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी पोलिसांनी लग्न मोडण्याचे कारण विचारले. त्यावर मुलाने दिलेले उत्तर ऐकून सर्वांना धक्काच बसला. टिळा लावण्याच्या कार्यक्रमावेळी वापरलेले कुंकू हे ब्रँडेड नव्हते; तसेच माझ्याशी मुलीची आई बोलली नाही, अशी थातुरमातुर कारणे दिली.

मुलीच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी मुलाचे वडील, आई, काकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अशा प्रकारे मुलीची व तिच्या कुटुंबाची फसवणूक करणाऱ्या कुटुंबाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज