अ‍ॅपशहर

हायप्रोफाइल व्यक्तींना जाळ्यात ओढणाऱ्या 'हनी ट्रॅप' गँगचा पर्दाफाश

देशातील विविध राज्यांतील हायप्रोफाइल व्यक्तींना जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणाऱ्या हनी ट्रॅप गँगचा उत्तर प्रदेशातील मेरठ पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Nov 2020, 1:35 pm
मेरठ: बड्या व्यक्तींना जाळ्यात ओढून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या 'हनी ट्रॅप' टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील पोलिसांनी या टोळीतील तिघांना गजाआड केले आहे. हे तिघे जण राजस्थानमधील एका छोट्याशा गावातून नेटवर्क चालवत असल्याची बाब उघडकीस आली आहे. आरोपींकडून १७ हजारांची रोकड आणि तीन मोबाइल जप्त केले आहेत. त्यांचे साथीदार साहिल आणि रफिक खान हे फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम हायप्रोफाइल व्यक्तींना जाळ्यात ओढणाऱ्या हनी ट्रॅप गँगचा पर्दाफाश


मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील अनेक बड्या व्यक्तींनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय साहनी यांच्याकडे ब्लॅकमेलिंगबाबत माहिती दिली होती. त्यानंतर सर्व्हिलान्स सेल आणि सिव्हिल लाइन पोलिसांनी या टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सोमवारी भैंसाली बस स्टॅण्डजवळ तिघा आरोपींना अटक करण्यात आली. हनीफ खान, कल्लू खान आणि मौसम अशी तिघांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तिघेही आरोपी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत.

'अशी' करायची शिकार!

ब्लॅकमेलिंग करणारी टोळी तीन गटांमध्ये काम करत होते. पहिला गट फेसबुकवर देशातील विविध भागांतील हायप्रोफाइल लोकांचा शोध घेत होते. तर दुसरा गट एखाद्या सुंदर मुलीचा फोटो प्रोफाइलवर ठेवून बनावट अकाउंटद्वारे संबंधित व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचे. त्यानंतर त्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यांच्याशी अश्लील चॅटिंग करून अश्लील फोटो किंवा व्हिडिओ परस्परांना पाठवायचे. ते फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करायचे. तर तिसरा गट हा आपल्या आजूबाजूच्या गावातील सर्वसामान्य व्यक्तींचे अकाउंट नंबर आणि पेटीएम नंबर मिळवायचे. त्या अकाउंटवर ब्लॅकमेलिंगमध्ये अडकलेल्या व्यक्तींकडून पैसे मागवले जायचे. अकाउंट असलेल्या व्यक्तींनाही त्यातील काही रक्कम दिली जायची. आतापर्यंत या आरोपींनी मुंबई, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरयाणासह अनेक राज्यांतील हायप्रोफाइल व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले आहे. ते राजस्थानमध्ये बसून नेटवर्क चालवायचे.

मुंबईच्या कंपनीने बँकेची १७ कोटींची 'अशी' केली फसवणूक

विवाहिता बेपत्ता; माहेरच्यांनी मुलीच्या सासरी येऊन केला राडा

Pimpri: दारूच्या नशेत वडिलांच्या डोक्यात हंडा घालून खून

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज