पुणे: टोळी वर्चस्वावरून हत्येचा प्रयत्न; गुंड बंडू आंदेकरला मध्यरात्रीच केली अटक
पुण्यात टोळी वर्चस्वावरून एकाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुंड बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
हायलाइट्स:
- पुण्यात टोळी वर्चस्वावरून वाद
- बंडू आंदेकर टोळीचा एकावर हल्ला
- हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार
- बंडू आंदेकरसह दोघांना पोलिसांनी केली अटक
पुणे: टोळीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करतो म्हणून बंडू आंदेकर टोळीने एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी बंडू आंदेकरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. ओंकार गजानन कुडले (वय २१ रा. गणेश पेठ) याने याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडू आंदेकर याला अटक करण्यात आली आहे. कुडले व आंदेकर टोळीचे अनेक दिवसांपासून वाद आहेत. शहराच्या मध्यवस्तीत आंदेकर टोळीचे वर्चस्व आहे. कुडले व त्याचे साथीदार हे टोळीचे वर्चस्व कमी करत आहेत. म्हणून त्यांनी कुडले याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गणेश पेठेतील बांबू आळी येथे २१ फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. आंदेकर याच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार खडक पोलिसांनी मध्यरात्री टोळीतील दोघांना अटक केली आहे.