अ‍ॅपशहर

ट्रक चालकाला मारहाण करून लुटले, पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या

ट्रकचालकाला मारहाण करून लुटमार करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चिकलठाणा पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2021, 4:24 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: ट्रकचा पहारा देणाऱ्या दोघांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या रिक्षा चालकासह तिघांना चिकलठाणा पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. ही घटना शनिवारी पहाटे जालना रोडवरील हिरापूर शिवारातील हॉटेल साईकृपा समोर घडली. विशेष म्हणजे पोलिसांना घटनेची माहिती देताच, त्यांनी अवघ्या पाच ते सहा मिनिटांत घटनास्थळ गाठले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ट्रक चालकाला मारहाण करून लुटले, पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या


शेख गफ्फार शेख सत्‍तार (वय ३१, रा. रहेमानिया कॉलनी, ह. मु. नारेगाव), शेख तौसीम शेख रफीक (वय ३१, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) आणि नासिर पठाण युनूस पठाण (वय २९, रा. आशियापार्क, नारेगाव) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून चोरीच्या ऐवजासह रिक्षा असा सुमारे एक लाख ७४ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे. आरोपींना रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी दिले. या प्रकरणात ट्रकचालक शेरसिंग दीपूराम राजपूत (वय ५२, रा. बिर्डाना, ता. जि. फतियाबाद हरियाना) यांनी फिर्याद दिली. राजपूत हे आर. आर. रोडवेज ट्रान्सपोर्ट येथे ट्रक चालक म्हणून पाच वर्षांपासून काम करतात. दोन जानेवारी रोजी ट्रकमध्ये ट्रान्सफार्मर लोडकरून कोलकाता येथे जाण्यासाठी राजपूत हे सहकारी राम अधीन रामदेव चौधरी, अवधेश बालकीश चौधरी यांच्या सोबत निघाले.

मध्यरात्री दोनची वेळ, पती-पत्नी घरात झोपले होते; इतक्यात...

८ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता औरंगाबाद जालना रोडवरील हिरापूर शिवारातील हॉटेल साईकृपा येथे ट्रक उभा करून रामआधीन आणि अवधेश हे दोघे ट्रकवर पहारा देत होते, तर उर्वरित लोक ट्रक मध्ये झोपी गेले होते. मध्यरात्रीनंतर तिघे आरोपी रिक्षा घेवून तेथे आले त्यांनी रामआधीन व अवधेश यांना चाकूचा धाक दाखवत मारहाण करून मोबाइल, रोख रक्‍कम असा सुमारे ११ हजार ३०० रुपयांचा ऐवज बळजबरी हिसकावून घेतला. आरडा-ओरड ऐकून राजपूत यांना जाग आली, त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. विशेष म्हणजे माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या पाच ते सहा मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून आरोपींनी रिक्षा पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केली. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने कोठडीचे आदेश दिले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी काम पाहिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज