अ‍ॅपशहर

जोगन श्री सद्गुरू विठामाई

जनस्थानी जसे अनेक अवलिये येऊन गेले तसेच परिसरात विखुरलेल्या अवलियांची संख्याही तितकीच आहे. गावोगावी त्यांचा निवास आढळतो. ज्या गावात रमले, त्या गावचे झाले असा त्यांचा नेम, शिर्डीला साईबाबांचे अस्तित्व असेच होते. गावातील माणसे श्रद्धावान असल्यास तेथे अवलियांचे रमणे झाले. या अवलियांमधलेच एक नाव म्हणजे जोगन श्री सद्गुरू विठामाई.

प्रशांत भरवीरकर | Maharashtra Times 12 Nov 2017, 4:00 am
विठामाई या नाथ संप्रदायातील एक महान योगिनी. गुरूभक्ती आणि प्रखर वैराग्याची मूर्ती होती. त्यांचा जन्म कोपरगाव तालुक्यातील कोऱ्हाळे या गावी १८५२ मध्ये झाला. विठामाईचे वडील श्रीधरबुवा हे विद्वान ब्राह्मण, नित्य पुराण सांगत. पित्याच्या मुखातून बालपणापासून भागवतपुराण यांसह अनेक ग्रंथांचे श्रवण केल्याने विठामाईंच्या बालमनावर अनुकूल परिणाम झाला. त्यामुळे भगवदभक्ती नित्यनेमाने करू लागल्या. त्यात लहान वयातच विवाहाची माळ गळ्यात पडली. पुढे पुढे तर संसाराची सर्व जबाबदारीच अंगावर पडली. द्रव्यसंचय झाल्यावर कुटुंबासह त्या काशियात्रेस गेल्या. तेथून पुढे प्रयाग, अयोध्या ही तीर्थक्षेत्रे करून गिरनार पर्वतावर दत्तप्रभू व गोरक्षनाथ महाराजांचे दर्शन घेऊन गावी परतल्या. ब्राह्ममुहूर्तावर उठावे, ध्यानधारणा व नामस्मरण करून दररोजचा व्यवहार निटनेटकेपणाने करावा. पुढे नाशिक येथील मुरलीधर मंदिरातील श्री हरिभाऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम awaliyanche jansthan special article on sadguru vithamai
जोगन श्री सद्गुरू विठामाई


संत यांचा अनुग्रह घेतला. नंतर नित्यनेमाने प्रतिवर्षी पंढरपूर, आळंदीच्या यात्रा त्या करीत. एकदा वावी गावावरून घरी परतत असताना अचानक विठामाईंचा घोडा थांबला. घोडा का थांबला असा विचार मनात आला, तर एक ध्वनी त्यांच्या कानावर आला. तुझी भावभक्ती पाहून आम्ही संतुष्ट झालो आहोत. विठामाईंनी विचारणा करताच आम्ही नाथपंथी नाथ आहोत. असे उत्तर मिळाले. नाथांकडून मिळालेल्या आज्ञेनुसार विठामाईंनी व्यापार बंद केला आणि परमार्थाला वाहून घेतले. आपल्या जवळील सर्व पैसा त्यांनी दान केला. नाथांच्या आज्ञेप्रमाणे गावाबाहेर पर्णकुटी बांधून तपाचरणाला सुरूवात केली. उपासनेत अनेक बाधा निर्माण झाल्या परंतु नाथ वचनावर अढळ श्रद्धा ठेवून देह पणास लावला. याप्रमाणे चाळीस दिवसांचे विठामाईंचे अनुष्ठान समाप्त झाले व पुढे नाथांच्या आज्ञेवरून दत्तपादुका व पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना केली. परंतु तसे करताना अनेक विघ्ने निर्माण झाली तरी नाथकृपेने त्यावर मात करून कार्य संपन्न केले. पुढे विठामाईस नाथांनी दीक्षा देऊन नाथयोगिनी केले. माईंनी पुढे अकरा वर्षे कठोर तपाचरण केले. लोकाग्रहास्तव पिंपळस या गावी कीर्तन झाल्यानंतर सर्व भक्त मंडळी माईंभोवती जमा झाली. परमार्थाची चर्चा सुरू असतानाच अचानक एक पट्टेवाला येऊन उभा राहिला व लखोटा माईंना देऊन ‘समन्स आहे’ असे सांगितले. माईंनी विचार केला आता कुणाचे देणेघेणे नाही मग हे समन्स कुणाचे म्हणून ‘स्पष्टपणे सांगा’ म्हणून विचारले तर पट्टेवाला म्हणाला, ‘नरसिंहसरस्वती महाराजांकडून आलो आहे, तीन दिवसांच्या आत मार्गस्थ व्हावे अन्यथा आपल्यावर पकड वॉरंट निघेल’ असे बोलून तो एका दिशेला दिसेनासा झाला. अशा प्रकारे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण सुरू झाले. गाणगापुरी जात असताना खंडेरायाच्या मंदिरात मुक्काम होता, पहाटे दृष्टान्त झाला, ‘गाणगापुरी स्वामी तुला दर्शन देतील.’ आशीर्वाद मिळाला होता. पुढे त्यांनी गाणगापुरला येऊन तप:साधना केली. स्वामींनी विठामाईंची प्रचंड परीक्षा घेतली.बारा वर्षे तप:श्चर्या करून तपाचे उद्यापन केले, तपश्चर्येची कौपिन वस्त्रे त्यागून शुभ्र वस्त्रे परिधान केली. कोऱ्हाळे गावात वस्ती करून कोरान्न भिक्षेवर उदरनिर्वाह सुरू केला. या काळात माता पित्याचे निधन झाले. कोऱ्हाळे गावात असताना प्रतिवर्षी माघमासात गुरूप्रतिपदेस गाणगापुरी यावे अशी स्वामींची आज्ञा झाली. गाणगापुरास जाण्यासाठी चितळी रेल्वेस्टेशनवर उभ्या असताना भजनाची वेळ झाली. नियम मोडून चालत नाही म्हणून स्टेशनवरच भजन गाण्यास सुरूवात केली. स्टेशनमास्तर भाविक माणूस होता, भजनात तल्लीन झाला. विठामाईंची चौकशी केली, भक्तीभावाने नमस्कार केला. गाणगापुरापर्यंतचे तिकिट काढून दिले व देवासाठी एक रूपया प्रसाद घेण्यासाठी दिला.

विठामाई कोऱ्हाळ्याच्या स्थायिक, जन्मभूमी कोऱ्हाळे. तेथेच त्यांचे सर्व तपाचरण झाले. असे असूनही गुरूआज्ञेनुसार मुखेड ता. निफाड या गावी त्या येऊन राहिल्या. भाऊबंद उपहासात्मक बोलत, त्यामुळे भक्तगणही उद्विग्न झाले होते. मुखेड गावाचे भाग्य थोर म्हणून योगिनी अन्त्यसमयी तेथे आली.

प.पू.जोगन विठामाई आणि प.पू. हरिनाथ ही गुरूशिष्याची जोडी. श्री गुरूदत्त महाराजांचे दर्शन झाले पाहिजे या अखंड ध्यासाने दोघेही वेडे झालेले. शहा या गावी विठामाईशी त्यांची भेट झाली. हरिनाथांनी माईंकडून नाथपंथाची दीक्षा घेतली व त्यांचे शिष्यत्व पत्कारले. पुढे विठामाईंच्या सेवेत त्यांचे आयुष्य गेले. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांच्यासारखी ही जोडी होती. गुरूभक्ती, गुरूसेवा, गुरूआज्ञा प्रमाण याचे मूर्तिमंत रूप म्हणजे विठामाई. निंबाच्या पानांचा रस पिऊन, शुभ्र वस्त्रे परिधान करून खडतर तपश्चर्येद्वारे त्यांनी नाथांची कृपा संपादन केली. रात्रंदिन हाती वीणा घेऊन भजनाद्वारे गोरक्षनाथांचे मन जिंकले. गाणगापुरचे नरसिंहसरस्वती महाराज व गोरक्षनाथ यांचे पूर्ण कृपाशीर्वाद त्यांना लाभले. आपल्या उग्र तपश्चर्येद्वारे आपले गुरू दीनानाथ यांचे नाव त्यांनी उज्ज्वल केले. अतिशय कोमल हृदयाच्या, माऊली समान असलेल्या, विठामाई जोगन मुखेड येथे ब्रह्मलीन झाल्या. मुखेड येथे समाधी स्वरूपात त्यांचे स्मारक आहे.

(अ.वि.पाठक यांच्या संग्रहातून)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज