अ‍ॅपशहर

बांबूची दुनिया

आपल्या रोजच्या जीवनातील अनेक वस्तूंचे बाजार सहसा शहरातील मध्यभागी वसलेले असतात. मात्र, नियमित लागणाऱ्या नसल्या तरी काही वस्तूंबाबत आपल्याला निश्चितच आकर्षण असते. त्या कुठे मिळतात याबाबत कुतुहल असते.

Maharashtra Times 17 Apr 2016, 2:20 am
शरद पवार, अंबरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bamboo world
बांबूची दुनिया


आपल्या रोजच्या जीवनातील अनेक वस्तूंचे बाजार सहसा शहरातील मध्यभागी वसलेले असतात. मात्र, नियमित लागणाऱ्या नसल्या तरी काही वस्तूंबाबत आपल्याला निश्चितच आकर्षण असते. त्या कुठे मिळतात याबाबत कुतुहल असते. असाच एक बाजार अंबरनाथ फॉरेस्ट नाका येथे वसला असून या बाजारात आसाम, चिपळूण आणि पाँडिचेरी येथील बांबूंची विक्री केली जाते. तसेच या बाजारात जुने दरवाजे, खिडक्या, शिड्या, परांची आदी विविध वस्तूंची मागणी या बाजारात असते. तर जाणून घेऊया या बाजाराबाबत.

अंबरनाथच्या पश्चिम भागातील कल्याण-बदलापूर महामार्गावर फॉरेस्ट नाका या परिसरात विविध जातींचे बांबू, दरवाजे, खिडक्या यांचा एक विशिष्ट बाजार वसला आहे. शहरापासून बाहेरील भागात म्हणजे शहर जिथे संपत तिथेच हा बाजार थाटला आहे. या बाजाराला विशिष्ट नावाने ओळख नसली तरी या रांगेत २५ ते ३० विविध जातींच्या बांबूची विक्रीची आणि १५ दुकाने जुने, नवीन दरवाजे, खिडक्यां यांची दुकाने आहेत. मागील १० वर्षांपासून हा बाजार येथे वसला आहे. सुरुवातीच्या काळात काही बेरोजगार कामगार येथे काही प्रमाणात बांबू आणून त्यांची विक्री करत असे. पुढे याच परिसरात असलेल्या एमएआयडीसी, ग्रामीण भागातून बांबूंची मागणी वाढल्याने कालांतराने या बाजाराचीही वाढ होत गेली. या बाजारात येणारे बांबू विशेषत: आसाम, कोकणातील चिपळुण आणि पॉण्डिचेरी या भागातून येतात. मात्र बाजारात सर्वाधिक मागणी आसामच्या बांबूंची असते. विशेषत: इमारतींचे, घरांचे बांधकाम करण्यासाठी या बांबूंचा वापर होतो. तसेच उंच इमारतींनी रंग मारण्यासाठी या बांबूची अधिक मागणी असते. तर एमआयडीसीतील कंपन्यांकडूनही विविध कामांसाठी मागणी असते. हा व्यवसाय विक्रीपेक्षा भाड्याने देण्यावरच अधिक चालतो. बांधकाम क्षेत्रात तसेच रंग मारणारे ठेकेदार भाड्यानेच बांबू घेतात. साधारण एका बांबूचे भाडे, १० रुपये याप्रमाणे महिन्याच्या कालावधीसाठी शेकडो बांबू भाड्याने दिले जातात. त्यातही एका बांबूसाठी ठेकेदाराकडून अनामत रक्कम म्हणून ९० रुपये घेतले जातात.

सण उत्सव, निवडणुकीत वाढती मागणी

बांबूचा व्यवसाय हा मुख्यत: बांबू इमारती आणि कंपन्यांच्या कामासाठी भाड्याने देणे यावर अवलंबून आहे. त्यातूनच आमचा ९० टक्के व्यवसाय चालतो. मात्र सणवार, निवडणुकीच्या काळात मागणी वाढते. तसेच गुढीपाडवा, मुस्लिम बांधवांच्या उरूसाच्या निमि​त्तानेही विशेष मागणी वाढते.

लोखंडी पाइपांमुळे फटका

पूर्वी इमारतीसाठी पॉण्डिचेरी येथून येणाऱ्या मजबूत बासाच्या बांबूंना मागणी होती. त्याचाच वापर इमारतींचे स्लॅब चढवताना आधार म्हणून केला जात असे. मात्र अत्याधुनिक काळात इमारतींच्या बांधकामांची पध्दत बदलली आहे. त्यामुळे या वासाला पर्याय म्हणून लोखडी पाइपचा वापर केला जात आहे. त्यामुळे वासाच्या मागणीवरही परिणाम झाला आहे.

दरवाजे, खिडक्यांना मागणी

घरे बांधताना नवीन इमारतीत नवीन दरवाजांचा वापर केला जात असला तरी अनेक ठिकाणी जुने घर पाडताना किंवा अनधिकृत घरे पाडताना अशा ठिकाणी वापरलेले दरवाजे, खिडक्या या बाजारात विकल्या जातात. चांगल्या प्रतिच्या लाकडाचे दरवाजे येथे मिळतात. त्यामुळे वापरात असलेल्या जुन्या दरवाजांवर काम करून त्यांचीही या बाजारात विक्री केली जाते. त्यामुळे नवीन दरवाज्याच्या तुलनेत जुने दरवाजे परवडणाऱ्या दरात विकत घेता येतात. तसेच बांबू, दरवाज्यांसोबत, शिडी, परांची याही येथे विक्रीसाठी असतात. इमारती, जागेभोवती कुंपण, बंगला, गोडाऊन यांना कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या प्रापाइल, पार्टीशियन शीट यांनाही या बाजारात मोठी मागणी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज