अ‍ॅपशहर

ओडिशाचे स्वागतार्ह पाऊल

सर्वसाधारणपणे विविध कंपन्यांकडून एखाद्या खेळाला प्रायोजकत्व मिळण्याची पद्धत आहे. एखाद्या राज्याने एक खेळ निवडून ठराविक कालावधीसाठी त्या खेळाला प्रायोजकत्व देणे तसे विरळाच. पण ओडिशा सरकारने तसे पाऊल उचलून नवा पायंडा पाडला आहे...

Maharashtra Times 17 Feb 2018, 12:28 am
सर्वसाधारणपणे विविध कंपन्यांकडून एखाद्या खेळाला प्रायोजकत्व मिळण्याची पद्धत आहे. एखाद्या राज्याने एक खेळ निवडून ठराविक कालावधीसाठी त्या खेळाला प्रायोजकत्व देणे तसे विरळाच. पण ओडिशा सरकारने तसे पाऊल उचलून नवा पायंडा पाडला आहे. भारतीय हॉकीला पुढील पाच वर्षांसाठी पुरस्कृत करण्याचा निर्णय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी घेतला आणि सर्वच स्तरावर त्याचे कौतुक झाले. आता पुढील काळात भारतीय हॉकीपटूंच्या गणवेशावर ओडिशाचे बोधचिन्ह शोभून दिसणार आहे. त्यातून एक वेगळा संदेशही क्रीडाजगताला मिळेल. ते स्वाभाविकही आहे. राज्य सरकारे विविध खेळांना, खेळाडूंना मदत करत असतात, पण एका राष्ट्रीय संघालाच पुरस्कृत करण्याचे पाऊल अद्याप कुणीही उचलले नव्हते. त्यामुळे ओडिशा सरकारचे त्यासाठी अभिनंदन करावे लागेल. मुख्य म्हणजे ओडिशासारख्या छोट्या राज्याने हे धाडस दाखवावे हे जास्त प्रशंसनीय आहे. एक मात्र खरे की, यामुळे कदाचित इतर राज्यांमध्येही विविध खेळांना पुरस्कृत करण्याची मागणी केली जाऊ शकेल किंवा निदान काही राज्ये ती वाट चोखाळतील. भारतीय खेळांच्या दृष्टीने हे पाऊल स्वागतार्हच ठरेल. आज भारतात क्रिकेट हा अत्यंत श्रीमंत असा खेळ मानला जातो. भारतीय क्रिकेट बोर्डाकडे आपला हा खेळ चालविण्यासाठी पैशांची अजिबात कमतरता नाही. ते राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट स्पर्धांचे फक्त आयोजनच करत नाहीत, तर आपल्या नफ्यातील वाटा संलग्न संघटनांनाही देतात. ही रक्कम काही कोटींच्या घरात असते. या पैशाच्या जोरावर त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी स्टेडियम्स आणि पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. हे चित्र अन्य खेळात मात्र दुर्दैवाने पाहायला मिळत नाही. हॉकी हा तर राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो. या खेळाची स्थिती आता काहीशी सुधारली असली तरी गेल्या काही वर्षात हा खेळ अगदीच रसातळाला जाऊन पोहोचला होता. ज्या खेळाने एकेकाळी सुवर्णकाळ अनुभवला त्यांना ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणेही मुश्किल झाले होते. या खेळाला मदतीचा हात देऊन ओडिशा सरकारने एकप्रकारे या खेळाप्रती असलेले ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. ही घोषणा करताना ओडिशाचे मुख्यमंत्री पटनाईक म्हणाले की, 'हॉकी हा ओडिशाचा आत्मा आहे आणि इथले लहान मूल हे हाती हॉकी स्टिक घेऊनच वाटचाल करते. राष्ट्रीय हॉकीसाठी ओडिशाने अनेक नामवंत हॉकीपटू देऊन या खेळातील आपला सिंहाचा वाटा उचलला आहे.' पटनाईक यांचे हे म्हणणे खरेच आहे. या वर्षाखेरीस ओडिशामध्ये विश्वचषक हॉकीचे आयोजन करण्यात आले आहे. एवढी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ओडिशासारख्या राज्यांत होऊ शकते, हीच त्यांच्या हॉकीप्रती असलेल्या प्रेमाची पोचपावती म्हणता येईल. आपल्या राज्यातील लोकप्रिय अशा हॉकीसारख्या खेळाला त्यांनी प्रायोजकत्व देण्याला म्हणूनच एक वेगळे महत्त्व आहे. त्यातून भारतीय हॉकीचा उत्कर्ष नेमका कसा होईल, हे आताच सांगणे कठीण असले तरी हॉकीला आधार देणारे हात आहेत, ही बाब दिलासा देणारी आहे. यानिमित्ताने अन्य राज्यांनीही विविध खेळांना पुरस्कृत करणे किंवा त्यांना असाच भरीव पाठिंबा देणे अपेक्षित आहे. आंध्र प्रदेशचा विचार केला तर आज गोपीचंदसारख्या खेळाडूची अकादमी तेथे आहे आणि त्यातून सायना, सिंधू, के. श्रीकांत, कश्यप, साईप्रणित असे अनेक नामांकित बॅडमिंटनपटू घडले. ही अकादमी त्या राज्याची ओळख बनली आहे. सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. हरयाणासारख्या राज्याने आपल्या खेळाडूंना प्रोत्साहनपर भरघोस मदत देण्याचे धोरण आखले आहे. ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल यात पदकविजेती कामगिरी केल्यास कोटी-कोटी इनामे खेळाडूंना दिली जातात, शिवाय, नोकरीचे दरवाजेही खेळाडूंसाठी खुले होतात. अशा खेळाडूंना मदत करणाऱ्या राज्यांच्या पंक्तीत ओडिशाचाही समावेश होत आहे. विविध कला, भारतीय संस्कृतीत ओडिशाचे योगदान आहेच, आता क्रीडासंस्कृतीतही ते स्वतःचा अमीट ठसा उमटवू इच्छितात. क्रिकेटेतर खेळांत आपण मागे नाही, हे आपण गेल्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सिद्ध केले आहे. बॅडमिंटन, टेनिस, बॉक्सिंग, तिरंदाजी, नेमबाजी या खेळांनी आपल्या आशा उंचावल्या आहेत. तेव्हा या खेळांना ओडिशाप्रमाणे मदतीचा हात देणारी राज्ये पुढे आली तर एक वेगळे चित्र भारतात पाहायला मिळेल, हे निश्चित!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Odisha

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज