अ‍ॅपशहर

स्फोटक, पण प्रज्ञात्म चरित्र

मार्क्स आणि मार्क्सवाद या दोन गोष्टी लेखक स्टेडमन जोन्स यांनी कौशल्यानं वेगळ्या केल्या आहेत. १८४४ मध्ये मार्क्सनं इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिकल मॅन्युस्क्रिप्ट्स लिहिलं. नंतर कम्युनिस्ट मेनिफेस्टो १८४८मध्ये प्रसिद्ध झाला.

Maharashtra Times 10 Dec 2016, 4:00 am
मार्क्स आणि मार्क्सवाद या दोन गोष्टी लेखक स्टेडमन जोन्स यांनी कौशल्यानं वेगळ्या केल्या आहेत. १८४४ मध्ये मार्क्सनं इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिकल मॅन्युस्क्रिप्ट्स लिहिलं. नंतर कम्युनिस्ट मेनिफेस्टो १८४८मध्ये प्रसिद्ध झाला. नंतर मार्क्सनं तत्वज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयावर अनेक पेपर्स लिहिले आणि १८५७ सालपर्यंत भांडवलशाही, बाजारव्यवस्था, जागतिक बाजार इत्यादी मुद्द्यांच्या अभ्यास करून एक ८०० पानांचं हस्तिलिखित सिद्ध केलं. त्यानंतर ‘कॅपिटल’ या विषयावर एका भल्यामोठ्या ग्रंथाची उभारणी मार्क्सनं सुरू केली. त्याचा पहिला भाग ‘कॅपिटल’ याच नावानं १८६७ साली प्रसिद्ध झाला. त्या नंतर मार्क्सनी नोंदी केल्या पण ग्रंथ प्रसिद्ध करण्यापर्यंत तडीस नेले नाहीत. १८४८पासून मृत्यूपर्यंत म्हणजे १८८३पर्यंत वरील ग्रंथाच्या पलिकडं मार्क्सनी अनेक टिपणं केली, दीर्घ पत्रव्यहारही केले. जोन्स यांनी मार्क्सचं प्रसिद्ध आणि असं अप्रसिद्ध साहित्य अभ्यासून प्रस्तुत पुस्तक सिद्ध केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम karl marx
स्फोटक, पण प्रज्ञात्म चरित्र


एंगल्स हा मार्क्सचा सहकारी. दोघांनी मिळूनच पहिला कम्युनिस्ट मेनिफेस्टो लिहिला. दोघांमधे घनिष्ट संबंध होते. ‘कॅपिटल’ लिहिण्यात एंगल्सचा वाटा होता. ‘कॅपिटल’चा पहिला भाग मार्क्सनं लिहिला. पण नंतरचे तीन भाग एंगिल्सनं मार्क्सचं हस्तलिखित संपादित करून लिहिले. एंगल्सनं संपादित केलेल्या तीन खंडातल्या मजकुराला ढोबळमानानं मार्क्सवाद असं संबोधलं जातं. लेखक जोन्स यांचं म्हणणं आहे, की मार्क्सच्या लेखनातले निवडक भाग उचलून, संपादित करून, त्यात बदल करून एंगल्स यांनी मार्क्सचे विचार मांडले. मार्क्सचे विचार काळाच्या ओघात सतत बदलत होते. मार्क्सनी आधीचे अनेक विचार सोडले होते. मार्क्सचे नंतरचे विचार आराखड्यात आणि लोकांना लिहिलेल्या पत्रात सापडतात. एंगल्सच्या ‘क्रांती आणि समाजवाद’ याबद्दल स्वतःच्या काही कल्पना होत्या, त्या कल्पना त्यांनी मार्क्सच्या नावावर खपवल्या असं लेखकाचं म्हणणं आहे. मार्क्सवाद ज्याला म्हणतात, तो विचार म्हणजे मार्क्सचे संपादित, बदल करून लिहिलेले विचार आहेत, मार्क्सचे विचार नाहीत असं लेखक दाखवतो.

युरोपातल्या त्या काळातल्या राजकीय आणि आर्थिक उलथापालथींमुळं समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था हादरेल असं मार्क्सनं लिहिलं होतं. एंगल्सनी ‘हादरेल’ हा शब्द खोडून त्या जागी ‘नष्ट होईल’ असा शब्द टाकला असं लेखक हस्तलिखिताचा दाखला देऊन सांगतात. एंगल्स डार्विन आणि मार्क्स यांच्या विचारधारेची तुलना करतात. मार्क्सवाद म्हणजे सोशल डार्विनिझम आहे असं एंगल्स म्हणत. मार्क्सना ते मंजूर नव्हतं. उत्क्रांती निसर्गात घडली, ती कोणी विशेष हेतू ठेवून घडवून आणली नव्हती असं मार्क्सचं म्हणणं. या उलट मार्क्स जी क्रांती, परिवर्तन घडवून आणणार होता ते परिवर्तन माणसाच्या हस्तक्षेपानं घडणार होतं.

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडून ग्रामीण फ्युडल व्यवस्था नष्ट होऊन वर्गविहीन समाजवादी व्यवस्था निर्माण होईल असं मार्क्स सुरुवातीच्या काळात म्हणत असे. हा सुरवातीचाच विचार एंगल्स यांनी समाजवादी विचार म्हणून प्रसृत केला. परंतु मार्क्स उत्तर काळात बदलले होते आणि रशियातील पूर्वीच्या सार्वजनिक मालकीच्या खेडूत समाजव्यवस्थेबद्द त्यांना प्रेम निर्माण झालं होतं याकडं लेखक लक्ष वेधतात. थोडक्यात असं म्हणता येईल, की सतत बदलत गेलेल्या मार्क्सच्या विचारांना आपल्या हितसंबंधांच्या चौकटीत समाजवादी चळवळीनं आणि एंगल्सनं कोंबलं असं लेखक म्हणतात.

आजवर मार्क्सच्या विचारांवर अनेक भाष्यं झाली. जोन्स यांचं भाष्य त्यातलं सर्वात वेधक आणि स्फोटक आहे. हे पुस्तक मार्क्सचं प्रज्ञात्मक चरित्र आहे. मार्क्स आणि मार्क्सचा काळ, त्या काळातले तत्वज्ञ, विचारवंत, राजकारणी यांचा तपशीलवार विचार या पुस्तकात आहे. भांडवलशाही ही विचारधारा किती लवचिक, प्रवाही आहे याचं दर्शन मार्क्सच्या लिखाणातून ध्यानात येतं असं लेखक म्हणतो. पुस्तक मार्क्सविरोधी अजिबात नाही. तो काळ आणि मार्क्सची विचारधारा कशी विकसित होत गेली याचं मर्मज्ञ वर्णन या अत्यंत महत्वाच्या आणि वाचनीय पुस्तकात आहे.

कार्ल मार्क्सः ग्रेटनेस अँड इल्युजन..अ लाइफ, लेः गॅरेथ स्टेडमन जोन्स, पेंग्विन बुक्स, पानेः‍ , किंमतः हार्ड कव्हरः २५६१ रु. , किंडलः १२२३रु.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज