अ‍ॅपशहर

चौंका देनेवाला फराळ

पक्ष नेताने विरोधी माने जाने वाले नेता के घर पहुंचकर सबको चौंका दिया। हालांकि वो नेता घर नहीं थे। ही चौंका देनेवाली बातमी वाचली आणि चौकलोच. इतका इतका की पॅट कमिन्सच्या चेंडूवर चौका(र) मारल्याचा आनंद झाला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 9 Jun 2021, 3:41 pm
पक्ष नेताने विरोधी माने जाने वाले नेता के घर पहुंचकर सबको चौंका दिया। हालांकि वो नेता घर नहीं थे। ही चौंका देनेवाली बातमी वाचली आणि चौकलोच. इतका इतका की पॅट कमिन्सच्या चेंडूवर चौका(र) मारल्याचा आनंद झाला. हालांकि या बातमीशी तसं आमचं काही देणं नाही की घेणं नाही. आपल्याला आनंद एकाच गोष्टीचा झाला. दिवाळीच्या दिवसात घरोघरी जाऊन फराळचा आनंद घेतला जातो, अगदी तस्साच (चिवड्यावर जणू तर्रीचा रस्साच) आनंद या उन्हाळ्याच्या दिवसांत भेटीगाठी घेऊन घेतला जाऊ शकतो, यावर विश्वास बसला. या दिवसांत फराळासोबतच्या चहाला आमरसाची जोड असू शकते. आमरस म्हटला की कुरड्याबिरड्या आल्याच. नाही कसे म्हणावे!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra fadnavis met many political leader in last two weeks
चौंका देनेवाला फराळ


दिवाळीच्या फराळाच्या दिवसांत शासकीय दौरे असल्यासारखी या घरी व्हिजिट, त्या घरी व्हिजिट असते. शासकीय विभागांत फायली जशा सारख्या, तसेच सारखे पदार्थ असतात. शासकीय फायलींत 'ज्या अर्थी' ते 'त्या अर्थी'च्या अमाप नोंदी असतात. फराळातल्या चिवड्यात तसेच शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, टपोऱ्या मिरचीचे तुकडे असतात. उत्तम शासकीय काम तसे सोबतीला शेवचकल्या, रवाबेसनाची बर्फीही असू शकते. किंबहुना असतेच.

त्या स्वपक्षीय आणि विरोधीपक्षीय भेटीगाठींच्या बातम्या वाचून इतका सर्व अॅनालिटिकल विचार झर्रकन मनात आला. कमलपक्षीय राजकारणाचा अन्वयार्थ काढणं हे काही सोपे काम राहिलेले नाही. देव इंद्राचे मनी काय, हे कळणे मोठे कठीण! तरीही प्रयत्न सुरू ठेवावा. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे. त्यामुळे या उन्हाळी आणि त्या दिवाळी फराळातलं कनेक्शन शोधून काढणं ही सोपी गोष्ट नव्हे. स्वत:ला दाद दिली. पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला, पण जमलं नाही. जमेल हेही एखाद्या दिवशी. ...है तो मुमकीन है!

कनेक्शन शोधून काढल्याचं वाहिन्यांना कळलं. वाहिन्यांनी गाठलंच. तुम्हाला सांगतो, सामान्य माणून असूनही मोठ्या शिताफीनं बाइट दिला. बर्फीचा बाइट घेतल्याचं जाणवू दिलं नाही. मराठीत बोलून झाल्यानंतर लगेच हिंदीत बोललो, 'दिवाळी के दिवस में ये फराळ करने हम जाते है. अगदी वैसेच उन्हाळी फराळ को हम गये थे...' असं सगळं सांगितलं. मुद्द्याचं तेवढं सांगितलं नाही. ऐकून-बघून आपलाही राजकीय सराव झाल्याचं एकदम जाणवलं आणि कौतुकच वाटलं. हे कौतुक चेहऱ्यावर येऊ दिलं नाही. कोण जाणे भविष्यात 'दिल्ली' संधी मिळाली तर! सर्व पद्धतीची तयारी हवी.

अलीकडे यास्तवच चौंकादेनेवाल्या बातम्या वाचत असतो. चौंकादेनेवाल्या बातम्यांच्या शोधात असतो. चौंकादेनेवाल्या बातम्या क्रिएट कशा करायच्या याचाही अभ्यास सुरू आहे. नजरेच्या टप्प्यात बंडीभर पुरावे आहेत आणि म्हणून भेटीगाठीचा फराळी दौरा काढण्याचा आम्हीही निर्णय घेतला आहे. हा दौरा शुद्ध कौटुंबिक आणि विचारपूसीय असणार आहे. अध्यक्षमहाराज, साऱ्याच गाठीभेटी या राजकीय नसतात. दिवाळीतला प्रत्येक फराळ जिव्हाळ्याचा नसतो. तो नेमका कसा असतो याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी दिवाळी काय नि उन्हाळी काय, असा चौंकादेनेवाला फराळ करायला काय हरकत आहे!

- चकोर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज