अ‍ॅपशहर

ती गुप्त खलबते...

'पण तुम्ही दोघंच नक्की काय बोललात?' सतराव्यांदा हा प्रश्न आला आणि आमचे डोके फिरले. आम्ही त्यावर उलटून जोरदार शाब्दिक फटकारा मारणारच होतो; पण स्वत:ला सावरले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 10 Jun 2021, 2:25 pm
'पण तुम्ही दोघंच नक्की काय बोललात?' सतराव्यांदा हा प्रश्न आला आणि आमचे डोके फिरले. आम्ही त्यावर उलटून जोरदार शाब्दिक फटकारा मारणारच होतो; पण स्वत:ला सावरले. अशा वेळी साऱ्यांकडे दुर्लक्ष करावे. कोणीही कितीही बोलले, सतत प्रश्न विचारत राहिले, तरी आपण शांत राहावे. उत्तर देण्याच्या फंदात पडू नये. लोक प्रश्न विचारतात विचारतात आणि शेवटी दमून स्वस्थ बसतात. आपण उत्तर दिले आणि त्यांचे समाधान झाले, असे कधीच घडत नाही. आपल्या उत्तरावर त्यांचा प्रश्न असतोच. त्यातून पुन्हा काही तरी चर्चा, दळण सुरू होते. तेव्हा काहीच न बोललेले बरे. लोकांना बोलू द्यावे. बोलणाऱ्याचे तोंड दुखते, हे लक्षात ठेवावे, असा त्या व्यक्तीने दिलेला सल्ला आठवला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jata jata by chakor cm uddhav thackeray personal meeting pm narendra modi
ती गुप्त खलबते...


त्याचे झाले काय, आम्ही सध्याचे तीन मित्र, संस्थेच्या केंद्रीय प्रमुखांना भेटायला गेलो होतो. तसे ते आणि आम्ही, म्हणजे दस्तुरखुद्द स्वत: एके काळचे सहकारी. आमच्या विभागीय कार्यालयात एकत्र काम करत होतो. काही कारणाने, आम्हाला त्यांची साथ सोडून, तेथे दुसऱ्या मित्रांबरोबर कारभार करणे भाग पडले. कारभार सुखेनैव सुरू होता; परंतु विभागीय कार्यालयातील काही बाबी केंद्रीय कार्यालयाशी निगडित असतात. केंद्रीय प्रमुखांचे स्थानिक पाठीराखे आमच्या कारभारात अडचणी निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करीत असतात; किंबहुना करतातच. अर्थात, आम्ही काही त्याचा त्रास करून घेत नाही. तेच त्यांचे बोलतात आणि 'पडले... पडले...' म्हणत राहतात. आपण आपले मास्क लावून शांत बसावे, हे आमचे धोरण. तर तेही असो. आम्ही केंद्रीय प्रमुखांकडे विभागीय कार्यालयातील काही समस्या घेऊन गेलो होतो. त्या समस्या त्यांनी दूर कराव्यात, अशी अपेक्षा होती.

आम्ही तेथे पोहोचलो. केंद्रीय प्रमुखांनी स्वागत केले. आम्ही आमच्या समस्या मांडल्या. त्यांनी त्या ऐकून घेतल्या. त्यावेळी ते काही बोलले अथवा नाही, ते नीटपणे सांगता येणार नाही; कारण त्यांच्याही तोंडावर मास्क होता. इतर वेळी खणखणीतपणे ऐकू येणारे त्यांचे शब्द त्यामुळे तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखे वाटले; किंबहुना तसेच झाले. आम्ही निघालो, दोघे पुढे निघाले आणि त्यांनी आम्हास थांबण्याची विनंती केली. आम्ही थांबलो. म्हटले, शेवटी इतक्या वर्षांचा घरोबा होता, तो असा चटकन तुटत नसतो. त्यांच्या मनीच्या गोष्टी ते आम्हापाशीच बोलणार.

आम्ही थांबलो. पुन्हा एकदा चहा आला. चहा घेण्याआधी आम्ही सॅनिटायझरने हात स्वच्छ केले. खोलीत कोणी नसल्यामुळे आणि प्रमुखही योग्य त्या अंतरावर असल्यामुळे मास्क काढून चहाचा आस्वाद घेतला. 'एक प्रश्न होता...' ते म्हणाले. 'विचारा ना...' 'चहा कसा झालाय?' त्यांनी विचारले. 'चांगला झालाय. दार्जिलिंगचा दिसतोय...' आम्ही उत्तर दिले. त्यावर ते गूढ हसले. का ते समजले नाही; पण 'मगाचचा चहा थंड झाला होता, म्हणून तुम्हाला थांबवून घेतले. आपण जुने सहकारी आहोत, पाहुणचारात कमी पडायला नको...' असे ते म्हणाले आणि चहा घेऊन आमची मीटिंग संपली.

बाहेर पडलो आणि प्रश्नांच्या फैरी सुरू झाल्या. शेवटी त्यांचाच सल्ला उपयोगी पडला आणि आम्ही मौन स्वीकारले.

- चकोर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज