अ‍ॅपशहर

दोन्ही 'कर' जोडोन...

बायकांचं वय आणि पुरुषांचा पगार विचारू नये असं म्हणतात. दोन्हींत त्यांची लज्जा सामावलेली असते. आता एखादी महिलाच पुढं होऊन आपलं वय सांगायला लागली तर? तद्वतच कुणी महामहीम स्वत:च पगार सांगू लागले, तरी कुणी काय करणार? कुणीही दिग्मूढ होईल!

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 29 Jun 2021, 1:54 pm
बायकांचं वय आणि पुरुषांचा पगार विचारू नये असं म्हणतात. दोन्हींत त्यांची लज्जा सामावलेली असते. आता एखादी महिलाच पुढं होऊन आपलं वय सांगायला लागली तर? तद्वतच कुणी महामहीम स्वत:च पगार सांगू लागले, तरी कुणी काय करणार? कुणीही दिग्मूढ होईल! त्यात त्यांनी पगारासोबतच इन्कम टॅक्स किती जातो, हेही सांगितले. पाचशे रुपये पगार मिळत असेल आणि त्यातले पावणेतीनशे रुपये टॅक्सपोटी जात असतील, तर कुणीही दु:खी-कष्टी होणारच. मग भले तो माणूस 'आठशे खिडक्या नऊशे दारं'वाल्या राजप्रासादात का राहत असेना! तीनशे साठ खोल्या असलेलं मोठं घर एखाद्याला द्यायचं आणि वर त्याचा निम्म्याहून जास्त पगार करापोटी कापून घ्यायचा, हे अगदीच चुकीचं आहे. एक मात्र आहे. माणूस कितीही मोठा का असेना; पाकीट मारलं गेलं की त्याचा चेहरा पंक्चर होतोच. तसंच हे आहे. कितीही पैसा मिळू देत; त्यातला थोडा इन्कम टॅक्सला जाणार म्हटल्यावर हळहळ ही वाटणारच. मुळात, आमच्यासारख्या नोकरदार माणसाचा सगळा पारदर्शक कारभार असतो. त्याच्या पगारातली दमडीही कुठं लपत नाही. 'फॉर्म १६' नावाच्या भिंगातून त्याची सगळी लाज उघडी पडत असते, तो हाच जून-जुलैचा काळ. नेमक्या याच काळात मोठमोठ्या माणसांना इन्कम टॅक्सकपातीची आठवण यावी, हे दु:खद आहे! बड्या लोकांची ही चर्चा ऐकून चारचौघांत आम्हाला भयंकर शरम वाटते. निम्मी उमर सरली, तरी करपात्र होईल एवढा पगार काही आमच्या भाळी नाही. मायबाप सरकारनं दिलेल्या '८० सी', '८० डी' वगैरे सवलती उपभोगून आमचे जे निव्वळ उत्पन्न उरते, ते चारचौघांत तर सोडाच; पण मनातल्या मनातही उच्चारायच्या लायकीचे नसते. दर वर्षी एक एप्रिल उजाडला, की आम्हाला स्वप्न पडते, की यंदा तर आपण कर भरणारच. अर्थात मुळात तेवढा आपला पगार होणार. मात्र, पुढच्या मार्चएंडला आमच्याकडून 'केंद्रीय शासनास अदा केलेली रक्कम' या नावाखाली भलेथोरले शून्यच उरते. मध्यंतरी चिडून जाऊन आम्ही सवलतींचे रकानेच भरले नव्हते. आता तरी टॅक्स कापला जाईल, या आनंदात आम्ही नाचत होतो. मात्र, आमच्या कार्यालयातील फायनान्स खात्यातल्या मित्राने परस्पर मागच्या वर्षीच्या नोंदींवरून सगळे रकाने भरले आणि आमची कशी चूक झालीय हे ऐकवून, आमचे कररूपी पैसे वाचवल्याबद्दल वर एक जेवण उकळलं. आपले फॅमिली डॉक्टर आणि आपला 'फॉर्म १६' काढणारा सहकारी या दोघांपुढं आपली कुठलीही लाज शिल्लक नसते. तशी ती राहतच नाही. त्यामुळं आम्ही या मित्रासमोर दोन्ही 'कर' जोडले आणि शांतपणे त्याला जेवायला नेलं. गंडेदोरे झाले, धूपदीप झाले, शनि-मारुती झाले, उपासतापास झाले... अमावस्येच्या रात्री पिंप‌ळाला की वडाला उलट्या फेऱ्या घालायच्या तेवढ्या राहिल्या आहेत. (भटक्या कुत्र्यांचं भय पगाराच्या लाजेहून अधिक वाटतं. त्यामुळंच ते राहिलंय...) पण आमचा इन्कम टॅक्स काही कापून जात नाहीय... असो. मात्र, कधी तरी आमचाही पगार करपात्र होईल आणि इन्कम टॅक्सच्या रूपाने आम्हीही देशसेवा करू, ही आशा मात्र अद्याप कायम आहे!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jata jata by chakor president ram nath kovind salary
दोन्ही 'कर' जोडोन...


- चकोर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज