अ‍ॅपशहर

अधुरी एक कहानी...

'ठेविले अनंते तैसेचि राहावे' हा संत तुकाराम महाराजांचा अभंग तंतोतंत अंगिकारून स्वत:त बदल न करणारे बहुचर्चित सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे नव्या बदली अध्यायाने पुनश्च प्रकाशझोतात आले. लोकप्रतिधीनींशी संघर्ष आणि मी सांगेल तीच पूर्वदिशा या हेकेखोर....

Maharashtra Times 23 Nov 2018, 4:00 am
'ठेविले अनंते तैसेचि राहावे' हा संत तुकाराम महाराजांचा अभंग तंतोतंत अंगिकारून स्वत:त बदल न करणारे बहुचर्चित सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे नव्या बदली अध्यायाने पुनश्च प्रकाशझोतात आले. लोकप्रतिधीनींशी संघर्ष आणि मी सांगेल तीच पूर्वदिशा या हेकेखोर वृत्तीने नऊ महिन्यांतच नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरून त्यांची उचलबांगडी झाली. खमक्या, कर्तव्यतत्पर, धडाकेबाज अशी बिरूदे चिकटलेला आणि चर्चा तसेच प्रसिद्धीचा झोत स्वत:भोवती ठेवणाऱ्या या सनदी अधिकाऱ्याची ही तीन वर्षांत चौथी बदली. पुणे पीएमपीएल व नवी मुंबई महापालिकेप्रमाणेच मुंढेंची नाशिक महापालिकेतील कामगिरी आक्रमक व तितकीच वादग्रस्त ठरली. वार्षिक भाडेमूल्यात कित्येकपट वाढ करताना हरितक्षेत्र आणि मोकळे भूखंडही त्यांनी करांखाली आणल्याने वादाची पहिली ठिणगी पडली. पाठोपाठ महापालिकेने मंजूर केलेल्या कोट्यवधींच्या कामांना त्यांनी कात्री लावली. प्रत्येक कामाला त्रिसूत्रीचा फॉर्म्युला लावल्याने अधिकार डावलल्याची लोकप्रतिधींची भावना अधिक गडद झाली आणि त्यातून मग महापालिकेची इमारत म्हणजे मुंढेंविरुद्ध लोकप्रतिनिधी असे रणांगणच बनले. नगरसेवक, महापौरांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही त्यांनी जुमानले नाही आणि त्याचा शेवट बदलीत झाला. या साऱ्या उंदीर-मांजराच्या खेळातही मुंढेंनी काही चांगली कामे करून छाप उमटवली. कामावर न दिसणारे सफाई कर्मचारी सुतासारखे सरळ होऊन स्वच्छ शहर नाशिककरांनी प्रथमच पाहिले. ई कनेक्ट अॅपमुळे नागरिकांच्या तक्रारींचा वेगाने निपटारा झाला. पन्नासपेक्षा अधिक सेवा अॅपवर आल्या. महापालिकेची आर्थिक भरभराट होऊन ११८ कोटींची एकरकमी परतफेड करण्यात आली. 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमाचीही नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत झाली. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही जरब बसून त्यांच्या कार्यशैलीत कमालीची सुधारणा झाल्याने नागरिकांची सहानुभूती मुंढेना लाभली. अर्थात, अंगणवाड्या बंद करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविणे, अतिक्रमणविरोधी मोहीम, ज्येष्ठांशी उद्धट बोलणे अशा प्रकारांमुळे मोठ्या वर्गाची नाराजी मुंढेंनी ओढावून घेतली. प्रशासनाचा गाडा हाकताना अधिकारी, पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक या सर्वांना विश्वासात घेऊन पुढे चालावे लागते. सोबत राजशिष्टाचारही पाळावे लागतात. पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरणारा हा अधिकारी या बदलीतून आत्मचिंतन करताना स्वभावदोषांना तिलांजली देऊन नव्या उमेदीने कामाला लागेल हीच अपेक्षा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a story unfinished
अधुरी एक कहानी...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज