अ‍ॅपशहर

झंझावात विसावला...

जगामध्ये फार कमी जणांना जगाला मागे टाकणे जमते. त्यांची कामगिरी ही माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा ठरते. निवृत्त होत असलेला उसेन बोल्ट हा धावपटू त्यांच्यातलाच एक.

Maharashtra Times 8 Aug 2017, 12:42 am
जगामध्ये फार कमी जणांना जगाला मागे टाकणे जमते. त्यांची कामगिरी ही माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा ठरते. निवृत्त होत असलेला उसेन बोल्ट हा धावपटू त्यांच्यातलाच एक. शंभर मीटर धावण्याची स्पर्धा ही जगातील सर्वांत वेगवान शर्यत. हे अंतर कमीत कमी वेळात पार करणारा हा वेगवान धावपटू ठरतो. गेल्या शतकाच्या सुरुवातीला हे अंतर दहा सेकंदांच्या आत माणूस पार करू शकेल असे कोणाला वाटत नव्हते. पण तो टप्पा नव्वदच्या दशकात गाठला गेला. दर दिवसाला बदलणारे तंत्रज्ञान आणि दर पिढीत वाढणाऱ्या मानवी क्षमता यामुळे हा टप्पा ओलांडला गेला. त्यानंतर माणसाला वेध लागले ते साडेनऊ सेकंदांमध्ये हा टप्पा पार करण्याचे. अजूनही तो टप्पा गाठण्यामध्ये अंतिम यश आले नसले तरीही बोल्टने २००९मध्ये ९.५८ सेकंदांमध्ये ही शर्यत जिंकून हा टप्पाही मनुष्याच्या आवाक्यात आल्याची जाणीव करून दिली. पुढच्या काही वर्षांमध्ये हा टप्पा सहज गाठला जाईलही. पण ही जाणीव पहिल्यांदा करून देणाऱ्या बोल्टचे महत्व कमी होणार नाही. गेली सतरा वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर या शर्यतीमध्ये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bolt final run
झंझावात विसावला...


वर्चस्व गाजविणाऱ्या बोल्टला कारकिर्दीतील शेवटच्या शर्यतीत मात्र सुवर्णपदकाने हुलकावणी द्यावी याला नशीब म्हणायचे की पुढच्या विजेत्याची पायाभरणी हे येणारा काळ ठरवेल. जमैकात जन्मलेल्या बोल्टने शालेय कारकिर्दीपासूनच शंभर मीटरच्या शर्यतींमध्ये छाप पाडली. त्या काळात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मायकेल जॉन्सनने तर बोल्ट हे भविष्य नक्कीच आहे, पण तो कामगिरीत सातत्य ठेवण्यात यशस्वी होतो का, असे सांगून त्याला जमिनीवर आणले. बोल्टने जॉन्सनच्या त्या वाक्याची खूणगाठ बांधत शेवटच्या शर्यतीपर्यंत आपले पाय जमिनीवर ठेवले आणि प्रगतीचे एक-एक टप्पे पार केले. त्या वेळेस जॉन्सनने, बोल्ट आत्ता काय करतो, यापेक्षा पाच-सहा वर्षांनंतर काय करतो हे महत्वाचे असे म्हटले होते. त्यानंतर आठ नऊ वर्षांतच बोल्टने विश्वविक्रम नोंदविला आणि अजूनही तो अबाधित आहे, हीच गोष्ट त्याचे महानपण स्पष्ट करते. ऑलिंपिकमधील आठ आणि जागतिक स्पर्धेतील अकरा सुवर्णपदकांच्या कामगिरीची बरोबरी करणारा आत्ता तरी कोणीच नाही. पण तो येणार नाही असेही नाही. किंबहुना बोल्टचा विक्रम मोडला जाईल, तो क्षण मानवाच्या प्रगतीमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज