अ‍ॅपशहर

लशीचे शुभवर्तमान

जगभरातील दोन कोटीहून अधिकांना बाधलेला आणि साडेसात लाखांहून अधिक बळी घेणाऱ्या करोनाला आळा घालणारी प्रतीक्षित लस अखेर सिद्ध झाल्याचे शुभवर्तमान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2020, 8:18 am
जगभरातील दोन कोटीहून अधिकांना बाधलेला आणि साडेसात लाखांहून अधिक बळी घेणाऱ्या करोनाला आळा घालणारी प्रतीक्षित लस अखेर सिद्ध झाल्याचे शुभवर्तमान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिले आहे. अवघ्या जगाला भयाच्या जाळ्यात बंदिस्त करणाऱ्या या विषाणूला आळा घालणारा उपाय अखेर वास्तवात सापडल्याच्या या दिलासादायक बातमीने, सगळ्यांना आनंद होणे साहजिक आहे. ही जगातली पहिली करोना लस असल्याचा दावा करताना पुतीन यांनी हेही स्पष्ट केले, की त्याच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या आज, बुधवारपासून सुरू होत आहेत. १८ जूनपासून ३८ स्वयंसेवकांसह मानवी चाचणीला प्रारंभ झाला आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या जुलैच्या मध्यास संपल्या. त्यात सहभागी सर्व स्वयंसेवकांमध्ये या विषाणूच्या विरोधात संरक्षक घटक विकसित झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या 'स्पुटनिक पाच' असे नामकरण केलेल्या लशीचे दोन टप्प्यांतील डोस मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी, दोन ठिकाणी एकदम आरंभ होईल. अनेक देशांनी या लशीची मोठ्या प्रमाणात नोंदणी केली असून, आठवडाभरात लक्षावधी डोस आपण बनवू, असा आश्वासक दिलासाही पुतीन यांनी दिला आहे. लशीची संभाव्य साशंकता दूर करण्यासाठी, त्यांनी आपल्याच एका मुलीला ते डोस दिल्याचे सांगितले आणि तिच्या प्रकृतीत झालेला बदल सांगितला. लस दिल्यानंतर ती सुदृढ राहिल्याचा निर्वाळाही दिला. सध्या जगभर शंभराहून अधिक ठिकाणी लस बनविण्याचे प्रयोग चालू आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, त्यातल्या किमान चार अंतिम तिसऱ्या चाचणीच्या टप्प्यात आहेत. त्यात पुढाकार घेत रशियाने दुसऱ्या टप्प्यातील यशाच्या आधारे पहिली लस नोंदवून बाजी मारली आहे. तिच्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी रशियाचे अधिकारी व जागतिक आरोग्य संघटनेच्या चमूची चर्चा अद्याप बाकी आहे. ती लवकरच होईल. दरम्यान, सगळे जग ज्या शुभवर्तमानाची वाट पाहत होते, ते आले आहे, हा मोठा दिलासा आहे. त्याचबरोबर, रशियाने मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करण्याची सज्जताही स्पष्ट केली आहे. ही लस भारतात येईपर्यंत अंतिम टप्प्यातील लसही तयार होईल; त्यामुळे कोणताही निर्णायक उपाय नसल्याच्या भयात जगणाऱ्या जगाला एक सुरक्षित आसरा नक्कीच लाभला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus vaccine

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज