अ‍ॅपशहर

आरोग्यव्यवस्था सलाईनवर

सलाईनची बाटली धरून उभी असलेल्या चिमुकलीच्या सोशल मीडियात व्हायरल झालेल्या फोटोवरून महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच कशी सलाईनवर आहे याचे विदारक दर्शन घडले. औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या वडिलांच्या शुश्रुषेसाठी एका चिमुकलीवर आलेली ही वेळ म्हणजे आरोग्याविषयीची सरकारी अनास्था अन् बेदरकारपणाचे संतापजनक दर्शन म्हणावे लागेल.

Maharashtra Times 11 May 2018, 4:00 am

सलाईनची बाटली धरून उभी असलेल्या चिमुकलीच्या सोशल मीडियात व्हायरल झालेल्या फोटोवरून महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच कशी सलाईनवर आहे याचे विदारक दर्शन घडले. औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या वडिलांच्या शुश्रुषेसाठी एका चिमुकलीवर आलेली ही वेळ म्हणजे आरोग्याविषयीची सरकारी अनास्था अन् बेदरकारपणाचे संतापजनक दर्शन म्हणावे लागेल. स्टँड मिळाले नाही म्हणून या चिमुकलीला अवघड स्थितीत सलाइनची बाटली सांभाळण्याची कसरत बराच काळ करावी लागली. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त झाला आणि आरोग्यव्यवस्था ऐरणीवर आली. या शासकीय रुग्णालयाची हालत आधीच कोमात गेलेल्या रुग्णासारखी आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम saline


औषधांचा तुटवडा, रिक्त पदे, निवासी डॉक्टरांचे उद्धट वर्तन याबरोबरच नातेवाईकांनाच स्ट्रेचरवरून रुग्णाची ने-आण करावी लागणे यासारख्या असंख्य आजारांनी हे रुग्णालय जर्जर झालेले आहे. पालकमंत्री हे स्वत: डॉक्टर तसेच आरोग्यमंत्रीही असताना मराठवाड्यातील सर्वात मोठ्या रुग्णालयात ही अवस्था असेल, तर गावोगावच्या आरोग्यकेंद्रांची काय अवस्था असेल याचा अंदाज येतो. अलीकडच्या काळात विविध उपायांमुळे आरोग्यव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे दिसत असले तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ती सुधारणा अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. त्याचीही प्रचिती या घटनेने आली.

खासगी रुग्णालयांमधील आर्थिक लूट आणि सरकारी दवाखान्यांतील अनास्था या कात्रीत गोरगरिबांचा जीव घुसमटतो आहे. सरकार मदत, सुविधा, योजनांचे प्रदर्शन करते; पण प्रत्यक्षात त्यातील फोलपणा हा अशा घटनांमुळे उघड होतो. गरिबांचे आरोग्य हा विषय जोपर्यंत के‌वळ निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये राहील तोपर्यंत हे अनारोग्य चालत राहील. गरीबांप्रति मनापासून कणव व तळमळ असेल, तरच योजनांच्या अंमलबजावणीला अर्थ राहील. अन्यथा घाटीतील एक नित्याची घटना म्हणून त्याकडे पाहिले जाईल अन् पुन्हा एखादी अशीच घटना घडल्यावर सर्वांना जाग येईल. हे टाळावयाचे असेल तर सरकारी रुग्णालयांचा चेहरामोहरा हा मुळापासूनच बदलावा लागेल. तशी इच्छाशक्ती मात्र सरकारला दाखवावी लागेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज