अ‍ॅपशहर

धरमशालेत गुढीपाडवा!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने मंगळवारी दिमाखदार विजय मिळविला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा केला. चाहत्यांना गुढीपाडव्याची भेट दिली.

Maharashtra Times 29 Mar 2017, 1:42 am
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने मंगळवारी दिमाखदार विजय मिळविला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा केला. चाहत्यांना गुढीपाडव्याची भेट दिली. १ एप्रिलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी मानांकनात अव्वल स्थानी राहणार असल्यामुळे भारतीय संघाला आयसीसीची गदा आणि सुमारे ६ कोटी ८१ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हा विजय साकारला. क्रिकेटचे मैदान आणि मैदानाबाहेर झालेल्या वादविवादांनी या सामन्याविषयीची उत्कंठा वाढविली होती. भारताकडून विराट कोहली तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श असे बिनीचे शिलेदार या सामन्यात खेळणार नव्हते. कौशल्य, योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीत भारतीय संघ सरस ठरला. जायबंदी कोहलीची जागा घेण्यासाठी मुंबईच्या श्रेयस अय्यरला बोलावण्यात आले. मात्र, अय्यरऐवजी कुलदीप यादवला संधी मिळाली आणि भारताचे हे नवे ‘अस्त्र’ कमालीचे यशस्वी ठरले. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळून कुलदीपने दबाव वाढविला. पहिल्या दिवशी माघारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, रहाणेचे आक्रमक नेतृत्व आणि त्याला गोलंदाजांनी दिलेली साथ यामुळे तिसऱ्या दिवशीच कांगारूंचा पराभव दृष्टिक्षेपात आला. अर्थात, हे यश एकाएकी मिळाले नाही. गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटपटूंची मानसिकता बदलते आहे. विजय मिळवण्यासाठी आवश्यक ते ‘किलिंग इ‌‌न्स्टिंक्ट’ नव्या दमाच्या क्रिकेटपटूंमध्ये ठासून भरले आहे. मैदानावर आणि बाहेरही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांच्याच भाषेत उत्तरे देण्याचा निडरपणा या क्रिकेटपटूंनी कमावला आहे. सौरव गांगुलीपासून सुरू झालेला खेळातील आक्रमकतेचा हा प्रवास विराटपर्यंत आला आहे. या सामन्यातील अजिंक्यचे नेतृत्व त्यास पूरक ठरले. अजिंक्य रहाणे, उमेश यादव, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा यांच्या कामगिरीने भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल केले आहे. दर्जेदार वेगवान गोलंदाजांची वानवा असणाऱ्या देशात दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाणारी उमेश यादवची गोलंदाजी हे सुखद वर्तमान ठरते आहे. जडेजाच्या निमित्ताने अष्टपैलू खेळाडूची कमतरता भरून निघते आहे. ऑस्ट्रेलियालाही कसोटी मालिका दिलासादायक ठरली. अनेक वर्षे क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा हा पुनर्बांधणीचा काळ आहे. फिरकीला साथ देणाऱ्या भारतीय खेळपट्ट्यांवर एक विजय व एक सामना अनिर्णित ठेवता येणे, ही कर्णधार स्टीव्ह स्मिथसाठी अभिमानाची बाब ठरावी.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज