अ‍ॅपशहर

आपत्ती'मुक्ती'ची आस!

'देर आये दुरुस्त आये' या म्हणीची पाठराखण अखेर रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांनी केली. शतप्रतिशत भाजपाचा नारा संघपरिवारातील राजकीय शाखेने बराच आधी दिला होता.

Maharashtra Times 3 Apr 2018, 8:47 am
'देर आये दुरुस्त आये' या म्हणीची पाठराखण अखेर रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांनी केली. शतप्रतिशत भाजपाचा नारा संघपरिवारातील राजकीय शाखेने बराच आधी दिला होता. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या कक्षा रुंदावण्याचा अधिकार असला पाहिजे. अवघे राजकीय आकाश व्यापून टाकण्याची महत्त्वाकांक्षा संबंधित पक्षाने बाळगली आणि ती कार्यकर्त्यांमध्ये संक्रमित केली तरी त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. अशा प्रेरणा सर्वच संघटनांना जोपासाव्या लागतात. राजकीय पक्षांच्या शहरी विस्ताराचा एकूणच मार्ग कॉर्पोरेट सेक्टरने वैविध्यशील केला असताना शंभर टक्के यशाच्या भावनिक संकल्पना गावखेड्यातील कार्यकर्त्यांचे आत्मबळ उंचावण्यासाठी पुरेशा ठरतात. इतके वर्षे आमच्या आशा-आकांक्षाचे दमन करणाऱ्या काँग्रेसला आम्ही सडतोड उत्तर देऊ, अशी सडेतोड भावना आधी जनसंघाच्या आणि नंतर भाजपाच्या सभांमधून नेहमीच मांडली गेली. केंद्रात प्रथमच भाजपाच्या नेतृत्वातील पूर्ण बहुतातील सरकार आल्यानंतर लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही याची काळजी सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी घेतली. मध्यंतरी मिळालेल्या विजयांनी केंद्रातील नेत्यांच्या मुक्त महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालण्याचे काम केले. काहीही झाले तरी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणायचेच या लक्ष्यपूर्तीसाठी भाजपाच्या नेत्यांचे बाहू फुरफुरू लागले. समाज माध्यमांवरून प्रचंड टीका सोसाव्या लागणाऱ्या राहुल गांधींना एका मेळाव्यात मुक्त संकल्पनेविषयीचा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला. लोकशाहीच्या बळकटीसाठी पक्षांचे सहअस्तित्व त्यांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केले. भाजपा संपावी असे आमचे मुळीच म्हणणे नसल्याचे त्यांना म्हणायचे होते. सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या अलीकडील वक्तव्याने नेमकी तीच री ओढली आहे. तराही राजकारणात 'मुक्त' भाषा चालते असे त्यांचे म्हणणे आहे. संघाला 'मुक्त'च्या भाषेऐवजी 'युक्त'चे धोरण हवे असल्याचा दावा त्यांनी केला. 'राष्ट्रनिर्मिती हे एका थोर पुरुषाचे कर्तृत्व नसते' हे संघाच्या सर्वोच्च नेतृत्वाने जाहीरपणे कबूल करण्याला सद्यस्थितीत फार महत्त्व आहे. नागपुरातील प्रतिनिधी सभेपासून संघनेत्यांना गावभाषेविषयी ममत्व वाटू लागले आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे त्यांनी दिलेले वक्तव्य म्हणजे २०१९च्या आपत्तीमुक्तीची आस तर नव्हे ना, याची खातरजमा केलेली बरी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jag nagpur
आपत्ती'मुक्ती'ची आस!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज