अ‍ॅपशहर

चिंब सुखाची वर्दी

गेल्या आठवड्यात अंदमानला न्हाऊ घालत नेहमीपेक्षा तीन दिवस आधीच, मंगळवारी नैऋत्य मोसमी पाऊस केरळात दाखल झाला. आता दरमजल करत गोव्याला गवसणी घालत तो पुढल्या सहासात दिवसांत मुंबापुरीवर बरसेल नि मग महाराष्ट्रभर आपली आभाळमाया पाझरती ठेवेल.

Maharashtra Times 31 May 2018, 1:35 am
गेल्या आठवड्यात अंदमानला न्हाऊ घालत नेहमीपेक्षा तीन दिवस आधीच, मंगळवारी नैऋत्य मोसमी पाऊस केरळात दाखल झाला. आता दरमजल करत गोव्याला गवसणी घालत तो पुढल्या सहासात दिवसांत मुंबापुरीवर बरसेल नि मग महाराष्ट्रभर आपली आभाळमाया पाझरती ठेवेल. अंगाची काहिली करणारा उकाडा आणि चिंब भिजवणाऱ्या घामाच्या धारा यातून सुटका करणारा वरुणराज वेळेवर येत असल्याची ही वर्दी सुखावणारी तर खरीच, पण यंदाच्या मोसमात सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस होणार हा अंदाज त्याहून अधिक आनंददायक म्हणायला हवा. यंदाच्या वर्षी वायव्येकडे म्हणजे पंजाब, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा पश्चिमी इलाखा या भागात जून ते सप्टेंबर या काळात सर्वात जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जुलैमध्ये सरासरीच्या १०१ टक्के तर ऑगस्टमध्ये ९४ टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. आषाढात आभाळाला गळती लागणार नि श्रावणात बरसत राहणार असा याचा अर्थ. जानेवारी महिन्यापासूनच पाणी पाणी करणाऱ्या महाराष्ट्रासाठी या सगळ्या आनंदवार्ताच आहेत. केरळात पर्जन्यमान मोजणाऱ्या १४ केंद्रांनी २५ मेपासून झालेल्या पावसाची नोंद ६० टक्क्यांहून जास्त झाल्याचे जाहीर केले आहे. केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीजवळ अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या ६-७ जूनपर्यंत पर्जन्यराजा मुंबईत आगमन करेल असे ही लक्षणे सांगतात. राजाने मारले आणि पावसाने झोडले तर कोणाला सांगावे असे आपल्याकडे पिढया न् पिढ्या म्हटले जाते. सर्वत्रच चांगला पाऊस होणार असल्याने शेतीची उपेक्षा निदान पाऊस तरी कमी करेल अशी आशा. पडणारे पाणी साठवण्यासाठी सरकार आणि जनता यांच्याकडून बोलले खूप जाते, प्रत्यक्षात ते किती आहे याचेही निदान या पावसाळ्यात व्हावे. गाजावाजा करून झालेली जलयुक्त शिवारे आणि पाणी फौंडेशनसारख्या बिगरसरकारी संस्थांचे भूजलपातळीबाबतचे दावे यांचा कस लागेल. नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच खालची पातळी गाठणाऱ्या महाराष्ट्रातल्या धरणांनी यंदा पोटात पुरेसा पाणीसाठा करावा आणि पाण्याविना तहानलेल्या मराठवाडा, माणदेश यांचे दशावतार कमी व्हावेत हीच प्रार्थना!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monsoon hits kerala announces skymet
चिंब सुखाची वर्दी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज