अ‍ॅपशहर

ओसाडगावचे राष्ट्रवादी!

नगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावर घसरला. लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची घसरण थांबण्याची चिन्हे दिसेनात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता असली तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही.

Maharashtra Times 1 Dec 2016, 12:39 am
नगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावर घसरला. लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची घसरण थांबण्याची चिन्हे दिसेनात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता असली तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. त्यांना उभारी देण्याचे काम नबाव मलिक आणि संजय दिना पाटील या मुंबईतील दोन नेत्यांनी प्राणपणाने केले आहे. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्व थरातील ‘राष्ट्रवादी’ पक्ष सोडून जात आहेत आणि मुंबईत पक्षाचे अस्तित्व नावापुरतेच आहे. तरीसुद्धा पक्षाच्या काही नेत्यांमध्ये असलेली लोकसेवेची आकांक्षा दाद देण्याजोगी आहे. नाहीतर ओसाडगावच्या पाटीलकीसाठी भर सभेत तलवारी नाचवण्याचे व रिव्हॉल्व्हर बाहेर काढण्याचे कारण काय? सामान्य कार्यकर्त्यांच्या पातळीवर हे घडले असते तर एकवेळ समजावून घेता येते. परंतु पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी खासदार यांच्यात ही झुंज झाल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ncp leaders attack
ओसाडगावचे राष्ट्रवादी!


आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे कुणी जमेत धरत नव्हते. शिवसेना-भाजपमधली टोकाची ईर्ष्या, मनसेची गोंधळलेली अवस्था आणि काँग्रेसची अस्तित्वाची लढाई यामुळे निवडणुकीची चर्चा या चार पक्षांभोवतीच सुरू असते. परंतु मंगळवारी सायंकाळी चेंबूरच्या सभेत घडलेल्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत एकदमच मुसंडी मारली आहे! वॉर्ड अध्यक्ष नेमण्यावरून जर एवढा संघर्ष होत असेल तर नगरसेवकाच्या उमेदवारीवरून काय घडू शकेल, याचा अंदाज बांधलेला बरा! बंदूक, रिव्हॉल्व्हरचे परवाने असणारे किंवा अवैध शस्त्रे बाळगणारे नेते मुंबईत तरी आजवर इतर प्रभावी पक्षांकडे अधिक होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अशा प्रतिभावंतांची यथोयोग्य कदर होऊ शकते, असा संदेश चेंबूरच्या घटनेमुळे गेला आहे. त्यामुळे साहजिकच मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेना किंवा भाजपकडे जाणाऱ्या काही शुचिर्भूतांची ‘राष्ट्रवादी’ पावले पडू शकतात. शेवटी मोदी यांचा आशीर्वाद आणि त्यांचे राजकीय मार्गदर्शक शरद पवार यांच्या आशीर्वादात तसा गुणात्मक काहीच फरक नाही. शिवाय, काही चुकले तरी पाठराखण करायला नवाब मलिक यांच्यासारखा प्रवक्ता आहेच. तेही नसेल तर संजय दिना पाटील यांच्यासारखा लोकनेता पाठीशी असेल. मुंबईत तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नोटबंदीवरून लोकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. हाच फॉर्म्युला राज्यात न पसरो, म्हणजे मिळवली!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज