अ‍ॅपशहर

अवकाळी दणका

शेतकऱ्याच्या दैन्यावस्थेला कोणीच वाली नाही. त्याच्या या अवस्थेला जशी राजकीय धोरणे कारणीभूत ठरतात, तसाच निसर्गही कारण आहे. मग ते ऐन सुगीत धो-धो पाऊस कोसळणे असो वा दाणे भरले जाताना तो गायब होणे असो. लहरी निसर्गापुढे शेतकरी नेहमीच हतबल होतो.

Maharashtra Times 22 Nov 2018, 4:00 am
शेतकऱ्याच्या दैन्यावस्थेला कोणीच वाली नाही. त्याच्या या अवस्थेला जशी राजकीय धोरणे कारणीभूत ठरतात, तसाच निसर्गही कारण आहे. मग ते ऐन सुगीत धो-धो पाऊस कोसळणे असो वा दाणे भरले जाताना तो गायब होणे असो. लहरी निसर्गापुढे शेतकरी नेहमीच हतबल होतो. परिणामी पदरी पराकोटीचे दु:ख आणि नैराश्य येते. गेल्या तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने तर त्याच्या दु:खात भरच पडली आहे. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना पाहावे लागले. कोल्हापूर आणि सांगली हे जिल्हे ऊस आणि द्राक्ष या नगदी पिकांसाठी ओळखले जातात. त्यातही बराचसा कोरडा भाग असलेल्या सांगलीची मदार द्राक्षावरच. द्राक्षबागांची छाटणी ऑक्टोबरात होते. या बागांतील वेलींवर घड आकारत होते, तर उशिरा छाटणी झालेल्या बागा सध्या फुलोऱ्यावर आहेत. नेमक्या याचवेळी सलग तीन दिवस पाऊस कोसळला आणि द्राक्षघडांबरोबरच शेतकऱ्याची स्वप्नेही मातीमोल झाली. बागांचे अतोनात नुकसान झाले. द्राक्षमणी फुटले, कोवळ्या घडात पाणी साचल्याने फळ व घड कुजू लागले. फुलोऱ्यावरील बागा मोडून पडल्या. साधे ढगाळ हवामानही सहन न होणाऱ्या बागांवर धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे बागवानांचे कंबरडे मोडले. प्राथमिक अंदाजानुसार तीनशे हेक्टर बागांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने पंचनाम्यांची तयारी केली असली तरी गेल्या वर्षीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यातच पीकविम्याचे जाचक निकष शेतकऱ्याच्या पदरात काही पडू देत नाहीत. या पार्श्वभूमीवर कर्ज काढून बागा जगविणारा शेतकरी उद्ध्वस्त होत असताना त्याला सावरण्याचे नैतिक कर्तव्य सरकारने गांभीर्याने पार पाडायला हवे. पावसामुळे ऊसतोडीही थांबल्या आहेत. ऊसदर आंदोलनामुळे साखर हंगाम दोन आठवडे पुढे गेला. त्यातच तोडी थांबल्याने दुहेरी फटका बसणार आहे. संकटमालिकेने गांजून गेलेल्या शेतकऱ्याला वेळीच आधार द्यायला हवा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rugged bunker
अवकाळी दणका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज