अ‍ॅपशहर

स्वहिताचा सौदी समतोल

दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांवर दबाव आणण्याची तयारी सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांनी भारत दौऱ्यात दाखविली असली, तरी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी थेट उल्लेख न केल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स 22 Feb 2019, 4:00 am
दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांवर दबाव आणण्याची तयारी सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांनी भारत दौऱ्यात दाखविली असली, तरी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी थेट उल्लेख न केल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांनी जारी केलेल्या निवेदनात दहशतवादी हल्ल्याचा निषेध जरूर करण्यात आला आहे; परंतु या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याचा उल्लेख नाही. भारत दौऱ्यावर येण्याच्या आधी सौदी राजपुत्र पाकिस्तानात गेले. आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या पाकिस्तानसाठी त्यांची ही भेट महत्त्वाची होती. त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत करण्यात पाकने कसूर ठेवली नव्हती. तिथे राजपुत्रांनी पाकिस्तानला वीस अब्ज डॉलरची मदत जाहीर केली आहे. तिथून थेट भारतात न येता ते मायदेशी परतून भारतात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी आपले संबंध पूर्णत: वेगळे आहेत आणि ते परस्परांशी जोडून त्यात गुंता निर्माण न करण्याचा इरादा त्यांनी या कृतीद्वारे दाखविला. भारत आणि पाकिस्तान या दोहोंत समतोल साधण्याची कसरत सौदी करीत असून, राजपुत्रांच्या भेटीतील दोन्ही देशांमधील संयुक्त निवेदनांतून ते स्पष्ट होते. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांवर दबाव आणण्याचे भारताबरोबरील निवेदनात असलेले विधान पाकिस्तानला उद्देशून आहे. मसूद अझर आणि त्याच्या दहशतवादी संघटनेवर निर्बंध घालण्याची मागणी भारत सातत्याने करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर, दहशतवादावरून निर्बंधाचे राजकारण केले जाऊ नये, असे विधान पाकमधील संयुक्त निवेदनात आहे. भारत आणि पाकिस्तान यांपैकी कोणाचीच बाजू न घेण्याची भूमिका राजपुत्रांनी अशा प्रकारे दाखवून दिली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हे राजपुत्र पाकिस्तान दौरा रद्द करतील, असा भाबडा आशावाद आपल्याकडे काहींनी व्यक्त केला होता. तो किती फोल होता, हे त्यांना आता जाणवले असेल. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक देश आपले स्वत:च्या हितांनाच सर्वोच्च प्राधान्य देत असतो. त्यामुळे खरेतर सौदी अरेबियाकडून याबाबत वेगळी अपेक्षा करणे अस्थानी होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saudi crown prince mohammad bin salman silent on pulwama attack in india visit
स्वहिताचा सौदी समतोल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज