अ‍ॅपशहर

शहाबुद्दीन विरुद्ध नितीश

राजकारणामध्ये ‘असंगाशी संग म्हणजे प्राणाशी गाठ असते’ ही म्हण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता खऱ्या अर्थाने समजत असेल. राजकारण करताना नीतिमत्तेच्या गप्पा मारणे सोपे असते; पण आपल्यावर वेळ आली की सत्तेसाठी सर्वकाही करावे लागते याचीही प्रचीती त्यांना आता येत असेल.

Maharashtra Times 14 Sep 2016, 12:20 am
राजकारणामध्ये ‘असंगाशी संग म्हणजे प्राणाशी गाठ असते’ ही म्हण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता खऱ्या अर्थाने समजत असेल. राजकारण करताना नीतिमत्तेच्या गप्पा मारणे सोपे असते; पण आपल्यावर वेळ आली की सत्तेसाठी सर्वकाही करावे लागते याचीही प्रचीती त्यांना आता येत असेल. बिहारमधील ‘बाहुबली’ नेता महंमद शहाबुद्दीनची तब्बल अकरा वर्षांनंतर तुरुंगातून जामिनावर झालेली सुटका ही नितीशकुमार यांची सत्त्वपरीक्षा पाहणारीच ठरणार आहे. त्यातच नितीश हे केवळ परिस्थितीमुळे झालेले मुख्यमंत्री आहेत, हा शहाबुद्दीनने दिलेला आहेरही त्यांना अजून पचनी पडायचा आहे. शहाबुद्दीन आज ना उद्या तुरुंगातून बाहेर येणारच होते; पण येताना ते नितीशकुमार यांची एवढी पंचाईत करतील, असे कधी कोणाला वाटले नसेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shahbuddin vs nitish kumar
शहाबुद्दीन विरुद्ध नितीश


बिहारच्याच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आदर्शवादी राजकारणी म्हणून आपली प्रतिमा तयार करण्याची धडपड नितीश यांची होती. म्हणूनच बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजपच्या मदतीने हातात घेतल्यानंतर लगेचच त्यांनी तब्बल ५५ हजार गुंडांना तुरुंगात डांबले होते. त्यांच्या या एका कृतीमुळे बिहारची आणि त्यांची स्वतःचीही प्रतिमा बदलली. मात्र, नरेंद्र मोदींचा उदय झाला आणि नितीशकुमार बिथरले. त्यांनी भाजपशी नाते तोडले; पण बिहारच्या खुर्चीचा मोह त्यांना सोडता आला नाही. अखेर त्यांना लालूप्रसाद यादव यांचीच मदत घ्यावी लागली. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नितीश आणि लालूप्रसाद यांच्या आघाडीने सत्ता मिळविली; पण लालूंचा पक्ष मोठा ठरला. नितीश आधी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री झाले; पण ते करताना त्यांना त्यांचा स्वतंत्र बाणा सोडून द्यावा लागला. लालूप्रसाद यांचे भक्त असलेले शहाबुद्दीन फार काळ तुरुंगात राहणार नाहीत, हे विजयाच्याच दिवशी स्पष्ट झाले होते. या आठवड्यात ते अखेर खरे ठरले. आता नितीशकुमार नक्की काय करणार हा प्रश्न आहे. कारण, राजकारणातील गुन्हेगारी संपविण्याची भाषा यापुढे त्यांना ताठ मानेने करता येणार नाही, तसेच, या कशाशी आपला संबंध नाही असेही ते म्हणू शकणार नाहीत. त्यामुळे परिस्थितीशी तडजोड म्हणून ते हे मान्य करून पुढे जाणार की विस्मरणात गेलेले व्यक्तिमत्त्व दाखवून देणार हा प्रश्न आहे. काही काळापूर्वी नितीशकुमार राजधानीत गेले तेव्हा, त्यांची पंतप्रधानांसोबतची देहबोली मैत्रिभावाची होती. या देहबोलीतही काही राजकीय गुपित दडले आहे का, हेही लवकरच समजेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज