अ‍ॅपशहर

नामविस्तार थांबवा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा करण्याचा निर्णय सत्तेवर येताच घेतला. याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची विनंती त्यांनी राज्यपालांना केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केवळ 'शिवाजी' नामोल्लेखातून अनादर व्यक्त होऊ नये, त्यांचा सन्मान राखला जावा, ही त्यामागील भावना असली तरी हा विषय असा मर्यादित, वा संपणारा नाही

महाराष्ट्र टाइम्स 11 Dec 2019, 4:29 am
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा करण्याचा निर्णय सत्तेवर येताच घेतला. याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची विनंती त्यांनी राज्यपालांना केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केवळ 'शिवाजी' नामोल्लेखातून अनादर व्यक्त होऊ नये, त्यांचा सन्मान राखला जावा, ही त्यामागील भावना असली तरी हा विषय असा मर्यादित, वा संपणारा नाही. विद्यापीठाचा आणि त्याच्या नामकरणाचा इतिहास समजून न घेताच नामविस्ताराची अनावश्यक आणि निरर्थक प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घाईने झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivaji-university


महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर शिक्षणाची पायाभरणी करण्याचे आव्हान पेलताना तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापूरसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवता यावी, या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळीही नामकरण कसे करावे, याबद्दल मत-मतांतरे होती. यशवंतरावांनी स्वतंत्र समिती नेमून यातून मार्ग काढला. विद्यापीठाचे नामकरण अखेर 'शिवाजी विद्यापीठ' असे झाले. आज जे विषय पुढे आले, त्याचा विचार त्यावेळीच झाला होता, हे त्यांचे द्रष्टेपण. इंग्रजीचा अंमल थोडा अधिकच झाल्याच्या आजच्या काळात अशा महापुरुषांच्या नावे असणाऱ्या संस्था, योजना, प्रकल्पांचे कोणते आणि कसे भ्रष्ट नामकरण झाले आहे, आणि त्यामुळे या महान युगकर्त्यांचे कर्तृत्व कसे झाकोळून गेले, हे सांगण्यासाठी असंख्य उदाहरणे आहेत. मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्थानकाचे काय झाले, राज्य सरकारच्या अनेक योजनांचे काय झाले, हे समोरच आहे. यातून या महामानवांचा सन्मान होण्याऐवजी त्यांचा अवमानच अधिक होतो. या असामान्य कर्तृत्वाच्या माणसांचे अशा रीतीने प्रतिमाभंजनाचे काम सुरू आहे.

विद्यापीठाचा नामविस्तार करताना महाराष्ट्रातील, विशेषत: कोल्हापूरच्या जनतेला गृहित धरण्यात आले. हा विषय अस्मितेचा असल्याने त्याचे स्वागतच होईल, अशी भावना त्यामागे असावी. हा प्रयत्न याआधीही कोल्हापूरच्या जनतेने हाणून पाडला होता. आताही सर्व थरांतून विरोध होतो आहे. 'शिवाजी विद्यापीठ' आहे त्याच नावाने राहू द्या, त्याचा संकोच करू नका, ही लोकभावना आहे. वाद न वाढवता तिचा नव्या सरकारकडून आदर होईल, ही अपेक्षा!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज