अ‍ॅपशहर

‘गुलाबी’ कसोटी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच सौरव गांगुली यांनी कार्यशैलीची झलक दाखविण्यास सुरुवात केली आहे...

महाराष्ट्र टाइम्स 31 Oct 2019, 10:31 am
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच सौरव गांगुली यांनी कार्यशैलीची झलक दाखविण्यास सुरुवात केली आहे. प्रकाशझोतात अर्थात दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा होकार मिळवण्यात सौरव गांगुली यशस्वी ठरले आहेत. पुढील नोव्हेंबर महिन्यात २२ ते २६ या तारखांच्या दरम्यान कोलकात्यात भारतातील प्रकाशझोतातील पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाचाही हा असा पहिलाच सामना आहे. दिवस-रात्र एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांना खेळाडू आणि चाहते प्रेक्षकही सरावलले आहेत. मात्र अशा प्रकारच्या कसोटी सामान्यांना आजवर जगात कुठेही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. प्रकाशझोतातील कसोटी सामन्यांना अधिकृतपणे सुरुवात होऊन आता एव्हाना चार वर्षे होऊन गेली आहेत. असे असूनही आजवर जगात या प्रकारचे म्हणजे दिवसरात्र चालणारे केवळ अकराच कसोटी सामने खेळले गेले आहेत. या आकडेवारीवरूनच या प्रकारचे सामने क्रिकेट चाहत्यांना फारसे पसंत पडलेले नाहीत, हे लक्षात येते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sourav ganguly is the chairman of the bcci
‘गुलाबी’ कसोटी


प्रकाशझोतातील कसोटी सामन्यांपुढे खरी अडचण आहे ती चेंडूची. पांढरा चेंडू पन्नास षटकेच वापरला जातो. त्यानंतर नवा चेंडू येतो. कसोटीत सामन्यांमधील नियमाप्रमाणे एका चेंडूने नव्वद षटके तरी खेळावीच लागतात. यात चेंडू डागाळला जातो. मग अंधारात तो वापरण्यास त्रासदायक ठरतो. यावर उपाय म्हणून पांढऱ्या चेंडूऐवजी आता गुलाबी चेंडू आला आहे. मात्र, या चेंडूच्या उपयोगितेबाबतची साशंकता संपलेली नाही. आगामी कसोटीच्या अनुषंगाने भारताचा कर्णधार विराट कोहलीसह बांगलादेशच्या क्रिकेट व्यवस्थापनानेसुद्धा गुलाबी चेंडूवर शंका व्यक्त केली होती. यापूर्वी २०१६ साली दुलीप करंडक स्पर्धेदरम्यान गुलाबी चेंडू वापरण्यात आला होता. तेव्हा बहुतांश खेळाडूंनी चेंडूच्या दृश्यतेबाबत नाराजी व्यक्त केली होती. गांगुली यांच्या आग्रहामुळे दोन्ही संघ या सामन्यासाठी राजी झाले आहेत. या सामन्यासाठी पुरेसे आणि दर्जेदार गुलाबी चेंडू उपलब्ध करून देणे, हे गांगुलींपुढील मुख्य आव्हान असेल. ते काम नीट पार पडावे याची काळजी ते नक्कीच घेतील. हा सामना बिनदिक्कत पार पडला तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवा 'गुलाबी' अध्याय जोडला जाईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज